भल्या पहाटेच पोलिसांनी केली गुन्हेगारांची चाचपणी
दि २६ एप्रिल (पीसीबी ) – तळेगाव दाभाडे पोलिसांनी शुक्रवारी (दि. २६) पहाटे कोम्बिंग ऑपरेशन केले. यामध्ये पोलिसांनी भल्या पहाटे ४० हिस्ट्रीशीटर, तडीपार आरोपींची चाचपणी करून त्यांच्याकडून बंधपत्र भरून घेतले.
लोकसभा निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलिसांनी कुरापती गुन्हेगारांची कुंडली काढली आहे. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवले आहे. दरम्यान, शुक्रवारी पहाटे तीन ते सहा या कालावधीत तळेगाव दाभाडे पोलिसांनी हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले.
कोम्बिंग ऑपरेशन मध्ये पोलिसांनी ४० गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्या गुन्हेगारांकडून बंधपत्र भरून घेण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच एकाकडून कोयता शस्त्र जप्त केले आहे. मतीन अकबर कुरेशी याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्यासह तीन अधिकारी, गुन्हे प्रगटीकरण (डीबी) पथकातील अधिकारी आणि १७ अंमलदारांनी सहभाग घेतला.















































