तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच मिळणार केंद्राची मंजुरी

0
215

खासदार श्रीरंग बारणे यांचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी, २२ (पीसीबी) – तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. अशीच परिस्थिती देहूरोड सेंट्रल चौक ते चांदणी चौक दरम्यान देखील असते. या मार्गांवरील कोंडी कमी करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत असून तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान उन्नत मार्गाला केंद्राकडून लवकरच मंजुरी मिळणार आहे. याबाबत स्वतः केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत माहिती दिली आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यात गुरुवारी (दि. २१) मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन महत्वाच्या रस्त्यांबाबत प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून देहूरोड सेंट्रल चौक-किवळे-वाकड-चांदणी चौक मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ला जोडणाऱ्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. मात्र अद्याप या मार्गांचे काम सुरु झालेले नाही.

यामुळे तळेगाव, चाकण, शिक्रापूर, पिंपरी-चिंचवड एमआयडीसी येथे जाणारी अवजड वाहने, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ कडे (मुंबई-बेंगलोर महामार्ग) जाणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडतात. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या दोन्ही मार्गावरील कामाला मंजुरी कधी मिळेल आणि काम कधीपर्यंत सुरु होईल, असे बारणे यांनी आपल्या प्रश्नात म्हटले.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रश्नाला केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले. नितीन गडकरी म्हणाले, पुणे-मुंबई मार्गासह तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गांवर मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक होते. या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दरम्यान उड्डाणपुल बांधला जाणार आहे. त्याचे डिझाईन बनवण्यात आले असून त्याचा डीपीआर देखील तयार झाला आहे. तो डीपीआर दिल्ली येथे मंजुरीसाठी आला आहे. त्याला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे.

पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर नवीन द्रुतगती मार्ग बनवला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवलेल्या कार्पोरेशनला बीओटी तत्वावर या रस्त्याचे काम देण्याबाबत विचार सुरु आहे. याच दरम्यान तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यानचा देखील उन्नत मार्ग बनवला जाणार आहे. त्याला लवकरच मंजुरी दिली जाईल.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गासह मुंबई-बेंगलोर महामार्गावर देहूरोड सेंट्रल चौक-रावेत-पुनावळे-चांदणी चौक या दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्याच अनुषंगाने बारणे यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. खासदार बारणे यांचा पाठपुरावा यशस्वी ठरत असून लवकरच उन्नत मार्गाला मंजुरी मिळणार आहे. मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवातील होईल