तळेगाव-चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना यापुढे आठ तास प्रवेशबंदी

0
114

तळेगाव, दि. १० (पीसीबी)

तळेगाव-चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मागील काही दिवसांपासून सकाळी आणि सायंकाळच्या वेळी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्यात वाढ करून आता सकाळी आणि सायंकाळी एकूण आठ तास अवजड वाहनांना बंदी असणार आहे. पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

तळेगाव-चाकण या मार्गावर तळेगाव, चाकण, महाळुंगे एमआयडीसी आहे. परिसरात हजारो कंपन्या असल्याने इथे येणाऱ्या-जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. राष्ट्रीय महामार्ग 448 डी (तळेगाव-चाकण) या रस्त्याच्या विस्तरिकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र त्यासाठी अजून अवकाश आहे. तत्पूर्वी या मार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रोजच्या कोंडीतून तळेगाव करांना सोडविण्यासाठी विविध स्तरावर पत्रव्यवहार केले.

आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या पत्र व्यवहारानंतर ट्रान्सपोर्ट असोसिएशन व वाहतूक विभाग यांची बैठक पार पडली. उद्योग व्यवसायाचेही नुकसान होऊ नये यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशन व वाहतूक यांच्या चर्चेनंतर मध्य मार्ग काढण्यात आला.

चाकण येथून पर्यायी महामार्ग उपलब्ध नसल्याने जड अवजड वाहतूक बंद ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्ग क्र 548 डी वरील स्वराज नगरी ते चाकण जाणाऱ्या जाणाऱ्या सर्व जड / अवजड, मध्यम (अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच हलकी/लहान वाहने प्रवासी बसेस वगळून) वाहनांना सकाळी आठ ते दुपारी दोन व सायंकाळी पाच ते सात वाजे दरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.

वरील कालावधीत ही वाहतूक वडगाव कमान तळेगाव एमआयडीसी आंबी सर्कल, कातवी नवलाख उंब्रे- बधलवाडी भामचंद्र डोंगर उजवीकडे वळून वासोली फाटा एचपी चौक मार्गे इच्छीत स्थळी जाईल. हा बदल रविवार (दि. 8 सप्टेंबर) पासून लागू करण्यात आला आहे.