तळेगाव-चाकण महामार्गावर अपघात; महिलेचा जागीच मृत्यू

0
16

तळेगाव, दि. 03 (पीसीबी) : तळेगाव-चाकण महामार्गावर योजना नगर येथे कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 2) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडला. पूजा काटकर (वय 45, रा. नानोली, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पूजा यांचे पती शांताराम काटकर (वय 45) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी विशाल शांताराम काटकर (वय 24) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालक बाळासाहेब नामदेव नागरगोजे (वय 27, रा. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम काटकर आणि त्यांच्या पत्नी पूजा हे दुचाकी (एमएच 14/डीक्यू 5890) वरून तळेगाव येथून चाकणच्या दिशेने जात होते. योजना नगर येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला कंटेनर (एमएच 46/बीएफ 7627)ने पाठीमागून धडक दिली.

या अपघातात दोघेही रस्त्यावर पडले. पूजा या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

उपाययोजना केल्या तरीही अपघात –
तळेगाव-चाकण महामार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात तळेगाव येथे या रस्त्यालगत बाजारपेठ, शाळा असल्याने नागरिक, विद्यार्थी यांची देखील मोठी वर्दळ असते. यामुळे या रस्त्यावर सातत्याने अपघात होत होते. सततच्या वाहतूक कोंडी आणि अपघातामुळे वाहतूक शाखेने सकाळी आणि सायंकाळी ठराविक वेळेत अवजड वाहतूक बंद केली. मात्र तरी देखील अपघातांचे सत्र सुरूच आहे.