तळेगाव, दि. 31 (पीसीबी)
तळेगाव एमआयडीसी परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना भारतात अवैधरित्या वास्तव्य केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) सकाळी नवलाख उंब्रे येथे करण्यात आली.
हुसेन शेख (वय ३१), मोनिरुल गाझी (वय २६), अमीरूल साना (वय ३४) अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रोशन पगारे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बांगलादेशी नागरिक आहेत. वैध कागदपत्रांशिवाय ते भारतात राहत होते. त्यांनी बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून घेत ते भारतीय असल्याचे भासवले. पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी कक्षाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.