पुणे, दि. ८ (पीसीबी) : तळेगाव एमआयडीसीमधील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन मिंडेवाडी येथे २२/२२ केव्ही क्षमतेचे स्विचिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन बुधवारी (दि. ७) महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. या स्विचिंग स्टेशनमुळे तळेगाव एमआयडीसी तसेच लगतच्या पाच गावांतील सुमारे १६५० औद्योगिक, घरगुती, वाणिज्यिक व इतर वीजग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.
तळेगाव एमआयडीसीमधील औद्योगिक ग्राहकांच्या संख्येसह विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी तळेगाव एमआयडीसी फेज दोनमधील मिंडेवाडी येथे २२/२२ केव्ही स्विचिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग व श्री. राहुल तिडके (एमआयडीसी), कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र येडके व श्री. दिलीप जोगावे (एमआयडीसी) आदींची उपस्थिती होती.
तळेगाव एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये सुमारे १५० उच्च व लघुदाबाचे औद्योगिक ग्राहक आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच जाधववाडी, बाधलवाडी, मिंडेवाडी, करंजविहिरे, नवलख उंब्रे या परिसरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर सुमारे १५०० ग्राहकांना या स्विचिंग स्टेशनमधून निघणाऱ्या आठ वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होणार आहे. येत्या तीन महिन्यांत कामे पूर्ण करून स्विचिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे अशी सूचना यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार यांनी केली.
या कार्यक्रमाला उपकार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र गोरे, शैलेश गिते, उपअभियंता संध्या बामणीकर (एमआयडीसी), सहायक अभियंता श्री. प्रशांत पवार, विजय कांबळे, सतीश ठिगळे व संतोष सूवर्णेकर (एमआयडीसी) आदींची उपस्थिती होती.