तळेगावात ट्राफिक वॉर्डनवर जीवघेणा हल्ला

0
357

तळेगाव दाभाडे, दि. ९ (पीसीबी) – तळेगाव दाभाडे येथे कर्तव्यावर असलेल्या ट्राफिक वॉर्डनवर एका टेम्पो चालकाने जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. ८) दुपारी एक आणि रात्री साडेआठ वाजता घडली.

सुकरोली उर्फ मुन्ना मकबूल शेख (वय ३१, रा. कातवी, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ट्राफिक वॉर्डन मारुती गव्हाणे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस पाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्राफिक वॉर्डन म्हणून तळेगाव स्टेशन चौकात कर्तव्यावर होते. बुधवारी दुपारी नंबर प्लेट नसलेला एक टेम्पो वडगाव बाजूने येताना दिसल्याने त्यांनी टेम्पो थांबवला. टेम्पो चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र चालकाने तो तळेगाव दाभाडे येथील प्रॉपर असल्याचे सांगत कागदपत्र दाखवणार नसल्याचा दम दिला. तसेच बघून घेण्याची धमकी दिली.

रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपी पुन्हा आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून कानाखाली मारली. फरशी उचलून मारण्यासाठी फिर्यादी यांच्या अंगावर आला. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी फिर्यादी चाकण रोडने पळू लागले. त्यावेळी चाकण बाजूने येणा-या ट्रकने त्यांना कट मारला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.