तळेगावच्या जनरल मोटर्स कंपनीस टाळे; नवी कंपनी सुरू होणार

0
5526

शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ तळेगाव ते मंत्रालय पायी धडक मोर्चा

जनरल मोटर्स एम्प्लाईज युनियन संलग्न श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारूती जगदाळे यांचा इशारा

पिंपरी, दि. 24 – पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील जनरल मोटर्स ही एक नामांकित कंपनी असून, ती बंद करण्यात आली आहे. त्या ठिकाणी दुसरी कंपनी येणार आहे. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या कंपनीने पूर्वीच्याच कामगारांना कामगार युनियनसोबत असलेल्या वेतनवाढ करारानुसार कामावर घ्यावे. तसे न झाल्यास हजारो कामगार व त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर येतील. शासनाच्या कामगार भूमिकेमुळे असे प्रकार घडत आहेत. या प्रकाराच्या निषेधार्थ तळेगाव ते मुंबई मंत्रालय अशी कामगार व त्यांच्या कुटुंबियांचा पायी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जनरल मोटर्स एम्प्लाईज युनियन संलग्न श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारूती जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमंवशी, सरचिटणीस रोहित पवार, कार्याध्यक्ष विकास करपे, सॅण्डविक एशिया एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष संतोष कणसे, विश्व कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, मनोज पाटील, संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनरल मोटर्स एम्प्लाईज युनियन संलग्न श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारूती जगदाळे म्हणाले की, तळेगाव येथील नामांकित जनरल मोटर्स कंपनी बंद करण्यास शासनाने 5 जुलै 2023 ला परवानगी दिली आहे. त्या ठिकाणी दुसरी कंपनी येत आहेत. शासनाचे कामगार विरोधी धोरण व नितीमुळे औद्योगिक क्षेत्रात असे प्रकार घडत आहेत. अचानक कंपनीस टाळे लावल्याने हजारो कामगार उघड्यावर आले आहेत. कंपनीवर अलवंबून असणारे असंख्य लघुउद्योग, वर्कशॉप व माल वाहतुक आदी व्यवसायावरही विपरीत परिणाम होणार आहे.

कंपनी बंद करण्यास परवानगी देणार्‍या शासनाच्या निषेधार्थ कंपनी ते तळेगाव तेथून मंत्रालय असे सहकुटुंब कामगारांचा पायी धडक मोर्चा काढणार येणार आहे. या मोर्चाची सरकारने दखल न घेतल्यास त्यापुढे कठोर निर्णय घेत आंदोलनाची धार वाढविण्यात येणार आहे. श्रमिक एकता महासंघाशी संलग्न असणार्‍या संघटना तसेच, पुणे जिल्ह्यातील सर्व कंपन्यांचा संप पुकारला जाईल. चक्का जाम आंदोलन केले जाईल. त्यांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर असले, असा इशारा मारूती जगदाळे यांनी दिला आहे.