तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पंतप्रधान कुसुम योजनेचा प्रभावीपणे प्रचार प्रसार करा -ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे निर्देश

0
302

मुंबई, दि. १० (पीसीबी) – पंतप्रधान कुसुम योजनेची अंमलबजावणी व त्याचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे करण्याचे निर्देश आज ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. कुसूम योजनेचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकारण ( महाऊर्जा) यासोबत मुंबई स्थित मराविम सुत्रधारी कंपनीच्या सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत डॉ नितीन राऊत यांनी महाकृषी ऊर्जा अभियान पंतप्रधान कुसुम योजना घटक ब योजनेचा आढावा घेतला. पंतप्रधान कुसुम ब योजनेअंतर्गत ५० हजार सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश डॉ राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले. ही योजना व त्याचे फायदे तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तिचा योग्य प्रचार व प्रसार करण्याची आवश्यकता असून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे डॉ राऊत यांनी यावेळी म्हटले.

“कुसुम ब योजनेअंतर्गत” शेतीला दिवसा ८ तास मुबलक प्रमाणात वीज पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या योजनेचा फायदा घेतलेल्या शेतकऱ्यांकडून ते या योजनेपासून समाधानी असल्याचे प्रमाणपत्र घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.