तळवडे आग दुर्घटनेतील एका जखमी रुग्ण महिलेचे ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

0
258

घटनेतील आजपर्यंतच्या एकुण मृतांची संख्या १२ वर

पिंपरी, दि. १६ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेतील जखमी रुग्ण सुमन गोधडे (वय ४० वर्षे) यांचे रात्री दोन वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज निधन झाले. ही अत्यंत दु:खद घटना असुन कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत आयुक्त शेखर सिंह यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

तळवडे येथील एका कारखान्यामध्ये दि. ८ डिसेंबर रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता तर १० जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्षे) आणि कविता राठोड (वय ४५ वर्षे) यांचे दि.९ डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय ३१ वर्षे) यांचे दि. १० डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर प्रियंका यादव (वय ३२ वर्षे) आणि अपेक्षा तोरणे (वय १८ वर्षे) यांचे दि.१४ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले. आज आणखी एक जखमी महिलेचे निधन झाल्याने तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १२ इतकी झाली आहे.

या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.