रेडझोन हद्दीतील तळवडे येथे अध्यावत हॉस्पिटल होण्याचा मार्ग मोकळा ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश

0
242

पिंपरी, दि.९ (पीसीबी) – रेडझोन हद्दीत असणारा तळवडे प्रभाग नेहमीच विकास कामापासून वंचित राहिलेला आहे. या प्रभागातील महापालिकेकडून कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व स्थानिक नगरसेवक पंकज भालेकर यांच्या प्रयत्नातून तळवडे प्रभागात मल्टीस्पेशलिस्ट अद्यावत हॉस्पिटल उभारणी करण्यासाठी महापालिका आयुक्त यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निर्देश दिले आहेत.

तळवडे, रुपीनगर, ज्योतीबानगर, त्रिवेणीनगर, गणेशनगर, ताम्हाणेवस्ती तसेच सहयोगनगर हा परिसर शहरापासुन दुर असल्याने या परिसराकरीता जवळचे मनपाचे कोणतेही हॉस्पिटल नाही. तसेच तळवडे व चिखली परिसर देहू कॅन्टेन्मेंच्या २००० यार्डाच्या परिघात येत असल्याने येथे कोणतेही बांधकाम अनुज्ञेय नसुन आरक्षणे विकसित करणेत येत नाहीत. या भागात पुर्वीपासुन या भागात राहणाऱ्या पुर्वीच्या रहिवाशांना आरोग्य विषयक मुलभुत सुविधा पुरविण्यास अडचण निर्माण झालेली आहे. जवळपास कोणतेही हॉस्पिटल नसल्याने अपघात, सर्पदंश अथवा हृदय विकारा सारखा त्रास झाल्यास नागरीकांना उपचार वेळेत मिळत नाही. त्यामुळे नागरीकांना जीव गमवावा लागतो.

तळवडे येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जागा उपलब्ध आहे. याठिकाणी बहुतेक आय. टी. कंपन्या असल्याने या परिसरात कंपन्यांपासुन कोणतेही ध्वनी व वायू प्रदुषण होत नाही. त्यामुळे तळवडे येथे हॉस्पिटल उभारण्यास MIDC च्या A-34 या १७९४० चौ.मी या भूखंडावर बांधलेली १०५१० चौ.मी चटई क्षेत्राची इमारत विनावापर शिल्लक आहे. ती इमारत सुस्थितित असुन त्यामध्ये कायदेशीर बदल करून सदरची इमारत हॉस्पिटल सुरुब करावी यासाठी अजित गव्हाणे व पंकज भालेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. हॉस्पिटल करीता इमारत बांधण्यास मनपास कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. ही बाब उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावरती एमआयडीसी अधिकारी व महापालिका आयुक्त यांना संयुक्त बैठक घेत एमआयडीसीची जागा हॉस्पिटल साठी देण्याबाबत अजितदादांनी तातडीने निर्देश दिले. त्यामुळे तळवडे, रुपीनगर, ज्योतीबानगर, त्रिवेणीनगर, गणेशनगर, ताम्हाणेवस्ती, सहयोगनगर सह चिखली या भागातील रहिवाशांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. तळवडे आय टी पार्क येथे MIDC च्या जागेत हॉस्पिटल उभारणे होणार असल्याने रेड झोन हद्दीत अनेक वर्ष वंचित असलेला हॉस्पिटलचा प्रश्न निकाली निघणार आहे.