तळवडेची वाहतूक कोंडी फुटणार, शेतकऱ्यांना जागेचा मिळणार 100% मोबदला,

0
7
  • तळवडे चिखली शीव रस्ता काम मार्गी लागणार
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जाहीर कार्यक्रमात सुतोवाच
    पिंपरी, दि. ९ रेडझोन संदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. रेडझोन भागातील रस्त्यांच्या भूसंपादनाकरीता तब्बल दुप्पट नुकसान भरपाई व टी.डी.आर देण्याचा प्रस्ताव मार्गी लागल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. प्रामुख्याने सर्वात महत्वाचा असा तळवडे-चिखली शीव हा २४ मीटरचा नवीन रस्ता मार्गी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे व माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी गेल्या वर्षभरापासून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रश्न सुटला आहे.
    चाकण औद्योगिक वसाहतीकडून येणाऱ्या वाहतूकीमुळे तळवडे परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा भाग रेड झोन हद्दीत येत असल्यामुळे रस्ते विकसित होत नाहीत. तळवडे येथे रस्त्यांसाठी भूसंपादन मोबदला (टीडीआर) ५० टक्के मिळतो. त्यामुळे जागा मालक जागेचा ताबा देत नाहीत म्हणून अनेक वर्षापासून रस्ते विकसित झाले नाहीत. शहरातील इतर भागात रस्त्यासाठी मिळणारा मोबदला व टीडीआर तळवडे रेडझोन हद्दीतील शेतकऱ्यांनाही मिळावा यासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे व नगरसेवक पंकज भालेकर यांनी त्यासाठी महापालिका आणि राज्य सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार केल्याने या मागणीला यश आले आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्त होणार असल्याचे सुतोवाच शुक्रवारी (दि. ८) चिंचवड येथील एका कार्यक्रमात केले. आजवर ५० टक्के भरपाई मिळत होती, आता ती १०० टक्के पर्यंत मिळणार आहे. रस्त्यांसाठी जागा मिळणे सोयिस्कर होईल आणि भविष्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली होईल.
    पिंपरी चिंचवड शहर व चाकण MIDC ला जोडणारा तळवडे निगडी हा एकमेव रस्ता आहे. चाकण, म्हाळुंगे MIDC, तळवडे आयटी पार्क तसेच देहू, निघोजे परिसरातुन पिंपरी चिंचवड शहरात याच रस्त्याने अवजड वाहतुक होत असते. या रस्त्यावर ४० फुटापेक्षा लांबीची वाहने व कंटेनर यांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी होत तीन किलोमीटर प्रवासासाठी २ ते ३ तास वाहतुक कोंडी होत असते. या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने वारंवार अपघात होत असतात. तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर, ज्योतीबानगर व गणेशनगर भागातील रहिवाशांना वाहतुक कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तळवडे ग्रामस्थ व औद्योगिक परिसरातील लघुउद्योजक पर्यायी रस्त्यासाठी वारंवार मागणी होती.

संपुर्ण तळवडे गाव व चिखली गावचा काही परिसर देहू अॅम्युनिशन डेपोच्या २००० यार्डाच्या परिघात येत असल्याने येथे कोणतेही बांधकाम अनुज्ञेय नसल्याबाबत मा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आदेश पारित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या परिसरातील आरक्षणे व रस्त्याच्या भूसंपादनाकरीता ५० टक्के नुकसान भरपाई अथवा टी.डी.आर दिला जातो. परिणामी या भागातील शेतकरी रस्ता विकसित करण्यास जागा देत नाहीत. या भागातील मुख्य रस्ते विकसित होत नाहीत. तर चाकण, म्हाळुंगे MIDC, तळवडे आयटी पार्क तसेच देहू, निघोजे या परिसराला पिंपरी चिंचवड शहराशी जोडणारे सर्व मुख्य रस्ते वगळता इतर रस्ते विकसित होत नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या भूसंपादनासाठी शहरातील इतर भागात मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या मुल्यांकनाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाल्यास शेतकरी रस्ते विकसित करण्यास मदत होणार आहे. हीच परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याशी बोलून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना संबंधित प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
चाकण औद्योगिक वसाहतीतून इंद्रायणी नदी पुलावरून सद्याच्या जो रस्ता आयटी पार्कमधून येतो त्याला समांतर दुसरा तळवडे चिखली शिवरस्ता प्रस्तावित आहे. हा नियोजित २४ मीटरचा रस्ता थेट स्पाईन रोडला मिळतो. दुप्पट भरपाईचा निर्णय झाल्याने हे काम मार्गी लागणार आहे. प्रभागातील रेडझोन हद्दीत असणाऱ्या अनेक रस्ते विकसित होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. बाधित शेतकऱ्यांना शंभर टक्के मोबदला मिळाला तर यापुढे प्रभागात असणारी रस्त्याची आरक्षण विकसित होण्यास मदत होणार आहे.