तर २५ तारखेपासून मी आमरण उपोषण – मनोज जरांगे पाटील

0
182

महाराष्ट्र, दि. २२ (पीसीबी) – मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसरकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी करत सरकारला अल्टीमेटम दिला होता. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र आता हा वेळ संपत आला तरी सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेलं नाही. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. जर सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

“राज्य सरकारने 24 तारखेच्या आत मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून मी आमरण उपोषण करणार आहे. त्या उपोषणामध्ये कोणत्याही प्रकारचे उपाचर, वैद्यकीय सेवा घेतली जाणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून कठोर उपोषण केले जाणार आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत गावात एकाही राजकीय नेत्याला येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं. तसेच 25 तारखेपासून साखळी उपोषण केले जाणार आहे. 28 तारखेपासून साखळी उपोषणाचे आमरण उपोषणात रुपांतर होणार आहे. याची तयारी मराठा समाजाने केली आहे. प्रत्येक गावात मराठा समाजाने येऊन कॅन्डल मार्च काढायचा आहे. हे शांततेचं आंदोलन सुरु झाल्यानंतर सरकारला झेपणार नाही,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

“सरकारने एक गोष्ट गांभिर्याने घ्यायला हवी. हे उपोषण महाराष्ट्रातले पाच कोटी मराठे चालवणार आहेत. या विषयाची गांभिर्याने दखल घ्या आणि 24 तारखेच्या आरक्षण द्या. मराठा समाजाला विनंती आहे की कोणीही उग्र आंदोलन करायचे नाही. त्याला माझे समर्थन नाही. कोणीही आत्महत्या करायची नाही. कारण मला तुमची गरज आहे. शांततेच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षण मिळणार आहे. मी प्राणाची बाजी लावून झुंज द्यायला तयार आहे. तुमच्या पाठबळाशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही,” असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“सगळं राज्य आमचे आहे आणि वाटाघाटीचा प्रश्न नाही. आरक्षण घेऊन कुठल्याही गावात जा तुमचे स्वागत होईल. मोकळ्या हाताने यायचं नाही. सगळ्या पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार यांनी आमच्या गावात यायचं नाही. जीआरसुद्धा ओबीसीमध्ये समावेश केलेला आणि टिकणारा हवा,” असे मनोज जरांगे यांनी म्हटलं.