तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल

0
292

दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – शिवसेना आमदार अपात्रतेच्या अंतिम टप्प्यातील सुनावणीला आजपासून सुरूवात झाली आहे. अंतिम सुनावणीत युक्तिवाद करण्यासाठी ठाकरे गटास दीड दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मंगळवार व बुधवार दीड दिवस शिंदे गटाचे वकिल युक्तिवाद करणार आहेत. सलग तीन दिवस अंतिम सुनावणी चालणार असून ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी आज त्यांची बाजू मांडली.

विधीमंडळ पक्ष हा मर्यादित कारणासाठी आहे, राजकीय पक्षापासून विभक्त होताना विधीमंडळ पक्षाला दुसऱ्या गटात विलीन होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही राजकीय पक्ष सोडून दुषऱ्या पक्षात सामील व्हा, तुम्हांला वाट्टेल ते करा, असे कामत म्हणाले.

दरम्यान १/३ किंवा त्याहून अधिक विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करू शकतो. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहुमत असलेले म्हणजे २/३ विधीमंडळ सदस्यांचा पक्ष हा प्रतिनिधीत्व करू शकत नाही, पण १/३ म्हणजे अल्पमतात असलेला गट राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कसे करू शकतो? असा सवाल यावेळी उपस्थित केला.
पुढे कामत म्हणाले की, इतक्या वर्षांत एकही कार्यकर्ता किंवा आमदाराने पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत, असे सांगितले नाही. तुम्ही सर्व काही नंतर केलेला बनाव आहे. जर उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नव्हते, तर तुमच्या समोर एकच मार्ग होता तो म्हणजे तुम्ही सर्व जण अपात्र ठरता. कारण तुमच्या सर्वांची निवड ही पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे.

पक्षाची रचना घटनाविरोधी हा शिंदे गटाचा दावा फ्रॉड आहे. एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड ठाकरेंनी केली. त्याच घटनाविरोधी पक्षरचनेचे शिंदे हे लाभार्थी आहेत.

पक्षरचना घटनाविरोधी असल्याचा शिंदे गटाचा दावा मान्य केला, तर शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल. कारण, त्याच घटनाविरोधी पक्षनेतृत्वात निवडणुका लढविल्या व ते आमदार झाले. शिंदेंचा दावा मानायचा झाला तर शिवसेनेच्या सर्वच्या सर्व आमदारांना निलंबित करावे लागेल. त्यामुळे शिंदे गटाचा हा दावा फ्रॉड आहे, असा युक्तीवाद उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला.