…तर शरद पवार हे राजकीय दृष्टीकोनातून भाजपाचे बाप – रोहित पवार

0
191

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टीचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचा फूटलेला गट म्हणजेच अजित पवारांच्या गटातील नेतेही उघडपणे शरद पवारांना लक्ष्य करत आहेत. शरद पवारांवर वेगवेगळे राजकीय आरोप करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आमदार रोहित पवार खिंड लढवत असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत शरद पवारांवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं. तसेच शरद पवारांचं कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष फूटण्यास भाजपा जबाबदार असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी यावेळी केलं आहे.

रोहित पवार म्हणाले, भाजपाची राजकीय खेळी शरद पवारांनी जुमानली नाही. भाजपाने शिवसेनेचा शिंद गट फोडला, त्यानंतर पक्षाचे दोन गट झाले. एकनाथ शिंदेंचा एक गट आणि उद्धव ठाकरे यांचा एक गट तयार झाला. हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात अगदी खलच्या पातळीवर जाऊन बोलू लागले, टीका करू लागले. त्याच वेळी भाजपा नेते मात्र निवांत एसी रूममध्ये बसून हा सगळा तमाशा बघत बसले होते. परंतु, शरद पवारांना ६० वर्षांचा राजकीय अनुभव आहे.

राष्ट्रवदीचे आमदार रोहित पवार म्हणाले, शरद पवारांचा राजकीय अनुभव मोठा आहे. अशी खेळी ते (भाजपा) जर शरद पवारांसमोर खेळत असतील तर शरद पवार हे राजकीय दृष्टीकोनातून भाजपाचे बाप आहेत. सध्या अशी परिस्थिती आहे की भाजपाला काय पाहिजे हे शरद पवारांना चांगलंच माहिती आहे. भाजपाला पाहिजे ते शरद पवार त्यांना देत नाहीत त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. भाजपा कुटुंब फोडण्यासाठी जबाबदार आहे. भाजपा ही पक्ष फोडण्यासाठी जबाबदार. त्यामुळे भाजपाबद्दल काय बोलायचं?