……तर राजकीय संन्यास घेईन; शहाजी बापू पाटील गावकऱ्यांसमोर थेटच बोलले

0
48

मुंबई, दि. 28 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात भरभरून मतदान झाले. महायुतीची त्सुनामी आली. भाजपासोबत शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुद्धा मोठं यश खेचून आणलं. शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक जण गेले होते. त्यात सांगोल्याचे शहाजीबापू पाटील हे सुद्धा होते. त्यांचं गुवाहाटीतील काय झाडी, काय डोंगर, हे विधान गाजलं होतं. या निवडणुकीत जिंकलो नाही तर फास घेईल असं अतितायीपणाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. पण त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. हा गड शेतकरी-कामगार पक्षानं पुन्हा ताब्यात घेतला बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले आणि पाटलांना धक्का बसला. आता त्यांनी भरसभेत राजकीय संन्यासाची भाषा केली आहे.

माजी आमदार शहाजी बापू पाटील हे पराभवानंतर पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. ते सक्रिय झाले आहेत. त्यांनी भेटीगाठीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूर परिसरात या पराभवाचे चिंतन आणि मंथन करण्यात येत आहे. यावेळी एका ठिकाणी जनतेशी संवाद साधताना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे आश्वासन दिले.

निवडणूकीत जरी पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावतील शेतात पाणी नाही आले तर राजकीय संन्यास घेईल, असे मोठे विधान शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. पराभव झाल्यानंतर सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांनी चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी हजारो कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

ही निवडणूक भावनिक मुद्यावर गेली होती, असे ते म्हणाले. दोन वर्षात ५ हजार कोटीचा विकास निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दोन वर्षात कोणी काम केली हे सांगोला तालुक्याला माहित आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी दीपक आबा यांना आणि देशमुख यांना खडेबोल सुनावले. सूडाचे राजकारण मी केले नाही करत नाही…शहाजीबापू निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर खचून जाणार नेता नाही. एकनाथ शिंदे, फडणवीस साहेबांकडून असं पद घेऊन येतो, असे ते म्हणाले. यामुळे शहाजीबापूंना पराभवानंतर पण मोठे पद मिळणार आहे, याची चर्चा होत आहे. पुढील स्थानिक स्वराज संस्थेत गुलाल घेऊनच येणार, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.