…तर मातंग समाजाच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होईल – अमित गोरखे

0
322

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – मातंग समाजाने शिक्षणाची कास धरल्यास समाजाच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होईल असे मत अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी व्यक्त केले.

मातंग समाज दसरा महामेळावा रविवारी भोसरी येथे पार पडला. मेळाव्याचे हे पहिलेच वर्ष होते. हा मेळावा मातंग चेतना परिषद, पिंपरी-चिंचवड आणि लहुजी टायगर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादा महाराज रामदासी होते. कार्यक्रमाला वक्ते म्हणून अंबादास सकट, धनंजय भिसे, प्रा. सुभाष खिलारे हे लाभले होते.

कार्यक्रमाची सुरुवात हलगीच्या तालावर शस्त्रपूजन मिरवणूकीने झाली. मोनिका गोळे हिने दाणपट्ट्याचे व दंडाच्या साहसी मर्दानी खेळाचे प्रदर्शन केले. दीप प्रज्वलन तसेच साहित्यरत्न श्री अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतिगुरू श्री लहुजी साळवे यांच्या अर्ध पुतळ्यांना पुष्प माला अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रसिद्ध लोक कलावंत आसाराम कसबे यांनी लहू वंदना सादर केल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमास सुरू झाली.

अमित गोरखे म्हणाले, स्त्रीशक्तीने एकत्र यावे. आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. जास्तीत जास्त शिक्षित समाज करून आपले योग्य ते स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून कशा प्रकारे वेगवेगळ्या योजना समाजासाठी राबविल्या गेल्या यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली.

अंबादास सगट यांनी मातंग समाजाच्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक विषयांवर भाष्य केले. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीची सुरुवात ही मातंग समाजापासून कशी झाली. तसेच बळीराजा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी व त्याचा पहिला बळी हा मातंग समाजाने दिला हे सांगितले. धनंजय भिसे यांनी सद्यस्थितीतील मातंग समाजाच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

खिलारे सरांनी मातंग समाजाची पूर्वपरंपरा काय आहे. 18 पुराणातील बसवे पुराण हे मातंग समाजाचे इतिहास सांगणारे पुराण आहे अशी माहिती दिली. ‘गाव गाडा’ आणि ‘गाव गाड्यांच्या बाहेर’ या दोन पुस्तकांचा संदर्भ देऊन मातंग समाजाचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्षीय भाषणामध्ये दादा महाराजांनी पुराण काळापासून शिवपार्वतीला हळद लावणारे, पहिला धागा तयार करणारे मातंग आहेत. तिथपासून शिवाजी महाराजांना पावनखिंडीच्या लढाईतून विशाळगडावरती घेऊन जाणारे चार प्रमुख अंगरक्षक हे मातंग होते याचे दाखले दिले. मातंगी देवी, मातंग ऋषी, श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी ऋषींपासून उज्वल परंपरा असणाऱ्या समाजाचे गेल्या हजार वर्षांमध्ये कसं सामाजिक अध:पतन झालं याच्यावर भाष्य केले. या दुर्बलतेमुळे आपल्या समाज बांधवांचे कसे ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण चालू आहे आणि आपण सर्व समाज म्हणून एकत्र येऊन हे रोखण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे अशी भूमिका मांडून समाज चेतना जागृतीचे भाष्य केले.

कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे यांचे प्रमुख सहाय्य लाभले. तसेच माजी नगरसेवक विलास मडिगेरी, उद्योजक अनिल सौंदाडे आणि आयोजकांमधील कार्यकर्त्यांच्या आर्थिक पाठबळावर कार्यक्रम किमान 400 जणांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब वाघमारे, अध्यक्ष लहुजी टायगर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुकन्या साक्षी कांबळे तसेच सचिन वाघमारे यांनी केले. तर, नाना कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.