तर भाजपचा मोठा पराभव झाला असता

0
287

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने आज (ता. १७ ऑक्टोबर) अखेर माघार घेतली आहे. हा निर्णय म्हणजे खरंतर भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जर निवडणूक झाली असती तर भाजपचा मोठा पराभव झाला असता, असा दावाही पाटील यांनी केला.

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेतील, अशी घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केली. त्यानंतर पटेल यांनी आपण अर्ज माघार घेणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सुरू असलेले डावपेच ज्यामध्ये ऋतुजा रमेश लटके यांचा मुंबई महापालिकेच्या सेवेतील राजीनामा मंजूर न करणे, त्यांना नाईलाजाने कोर्टात जावे लागणे, हा सर्व प्रकार अत्यंत क्लेषदायक व वेदनादायक होता. या सोबतच शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठवणे, हा प्रकारही या निवडणुकीसाठीच करण्यात आला आहे, असा दावाही पाटील यांनी केला.

महाराष्ट्राची परंपरा ही यापेक्षा वेगळी आहे. ज्यामध्ये एखाद्या जागेसाठी काही दिवस शिल्लक असताना शक्यतो निवडणूक बिनविरोध होते. तसेच, अंधेरीच्या या पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला असता, असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे. या निर्णयामुळे अनावश्यक गोष्टी टळल्या आहेत. ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून आणण्याच्या निर्णयाचे पाटील यांनी मनापासून स्वागत केले आहे.