…तर पवारांची औलाद सांगणार नाही

0
109

सातारा : महायुतीच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. अजित पवारांनी आपल्या कोट्यातील परभणीची जागा रासपचे नेते महादेव जानकर याना दिली. त्यामुळेही अजित पवारांची जागा वाटपातील एक जागा कमी झाली आहे. कारण, परभणीतील जागेसाठी राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांनी तयारी केली होती. मात्र, अजित पवारांनी ही जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडल्यानंतर राजेश विटेकर यांना आमदारकीचा शब्द देऊन कार्यकर्त्यांचे समाधान केले होते. आता, साताऱ्यातूनही अजित पवार यांनी आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याला थेट खासदारकीचा शब्द दिला आहे. विशेष म्हणजे खासदार न केल्यास पवारांची औलाद सांगणार नाही,अशा शब्दात अजित पवारांनी स्थानिक कार्यकर्त्यांपुढे विश्वास व्यक्त केला.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकांमधून निवडून ससंदेत जाणाऱ्या नेत्याला मतदारसंघात वेगळेच स्थान असते. त्यामुळे, उदयनराजे या जागेसाठी आग्रही होते, अखेर राष्ट्रवादीने साताऱ्यातील जागेवरील आपला दावा सोडल्यानंतर भाजपकडून उदयनराजेना तिकीट जाहीर करण्यात आले. महायुतीच्या उदयनराजेंना येथून महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदेंचं आव्हान आहे. त्यामुळे, उदयनराजेंसाठी आज साताऱ्यात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी आणखी एका नेत्याला खासदारकीचा शब्द दिला आहे. कारण, यापूर्वी दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना अजित पवारांनी आमदारकीचा शब्द दिला होता. आता, नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द दिला आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत, त्यामुळे उदयनराजे निवडून आल्यानंतर भाजपाची ही जागा खाली होणार आहे, त्या जागेवर राष्ट्रवादीला संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सातारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. राष्ट्रवादी काँग्रेसही या जागेसाठी आग्रही होती. मात्र, जागावाटपात ही भाजपला सोडण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे वाई तालुक्यातील राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार हा भाजप उमेदवार उदयनराजेंना मतदान करेल का अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यातच, अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांनी लग्नाचे निमित्ताने मौन पाळून कार्यकर्त्यांना संभ्रमावस्थेत ठेवले होते. मात्र, अजित पवारांनी जाहीर सभेतून नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द दिला, त्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, अजित पवारांनी नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द देताना कार्यकर्त्यांना एक अटही घातली आहे. साताऱ्यातील महायुतीच्या उमेदवाराला 1 लाखाच्या फरकाने निवडून द्या…, नितिन काकाला खासदार करणार, नाही केले तर पवारांची औलाद सांगणार नाही, अशा शब्दात अजित पवारांनी जाहीर सभेतून भूमिका मांडलीय.