…तर त्या नगरसेवकांना काळे फासणार

0
234

अहमदनगर, दि. २० (पीसीबी) – राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघाचाचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेले आहेत. या पार्श्वभूमीवर काल ( मंगळवारी ) जिल्ह्यातील शिवसेना नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी घेतली.

या बैठकीला अहमदनगर महापालिकेतील शिवसेनेचे तीन ते चार नगरसेवक अनुपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेच्या महिला नेत्या तथा माजी पदाधिकारी स्मिता अष्टेकरांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शिंदे गटात सहभागी झाल्यास शिवसेना नगरसेवकांना काळे फासण्याची धमकीच त्यांनी आज दिली आहे.

शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी मागील महिन्यात शिवसेनेची बैठक घेतली होती. या बैठकीलाही शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे व सुभाष लोंढे अनुपस्थित होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव व लोखंडे हे शिंदेंना भेटले तसेच त्यांचा आशीर्वाद घेतला होता.
संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी अहमदनगरमध्ये काल ( मंगळवारी) घेतलेल्या शिवसेनेच्या मेळाव्याला आनंदाश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणारे नगरसेवक अनिल शिंदे व लोखंडे यांच्यासह नगरसेवक सुभाष लोंढे यांनीही दांडी मारली. त्यामुळे शिवसेनेतील बंडखोरी उघडपणे समोर येत आहे. या मेळाव्याला शहरातील 23 पैकी तीन ते चार नगरसेवकांनी दांडी मारली. उपस्थितांनी मात्र आम्ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असे स्पष्ट केले होते.