दि. 9 (पीसीबी) – इन्फोसिस उद्योग समूहाचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारतीयांना आठवड्याला ७० तास काम करण्याचं आवाहन केल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा पाहायला मिळाली होती. कठोर मेहनत केल्यानंच प्रगती करता येते, या भूमिकेतून आवाहनाला एकीकडे समर्थन मिळत असताना दुसरीकडे त्यावर अमानवी म्हणत टीकाही केली जात होती. या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारची चर्चा बॉम्बे शेव्हिंग कंपनीचे सीईओ शांतनू देशपांडे यांनी नुकत्याच केलेल्या विधानावरून होताना दिसत आहे. भारतीयांच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्यांनी भाष्य केलं आहे. त्याचसोबत, देशातल्या संपत्तीचं केंद्रीकरण काही कुटुंबांमध्येच झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले शांतनू देशपांडे?
देशभरातील संपतीच्या वितरणाबाबत शांतनू देशपांडे यांनी परखड शब्दांत टिप्पणी केली आहे. आख्ख्या देशाची १८ टक्के संपत्ती फक्त २ हजार कुटुंबांकडे आहे. मला नेमके आकडे माहिती नाहीत, पण ही कुटुंबं देशाच्या एकूण करापैकी १.८ टक्के करदेखील भरत नसतील. हे फारच विचित्र आहे”, असं शांतनू देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आर्थिक स्थैर्य आणि काम करण्याची इच्छा
दरम्यान, शांतनू देशपांडे यांनी देशातील नागरिकांबाबत वर्गाबाबत त्यांच्या सविस्तर पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. “मला सर्वात वेदनादायी आणि सर्वात उशीरा झालेला साक्षात्कार म्हणजे बहुतांश लोकांना त्यांचे जॉब आवडत नाहीत. जर भारतातल्या सगळ्यांना त्यांच्या सध्याच्या नोकरीवर मिळतात तेवढे पैसे आणि आर्थिक स्थैर्य देउ केलं, तर त्यातले ९० टक्के लोक दुसऱ्या दिवशी कामावरच येणार नाहीत. मग यात अगदी पांढरपेशा नोकरदार वर्गही येतो आणि छोट्या स्टार्टअप्समध्ये काम करणारा कर्मचारी वर्गही येतो. सगळीकडे थोड्याफार फरकाने सारखीच स्थिती आहे”, असं शांतनू देशपांडेंनी म्हटलं आहे.
“हे वास्तव आहे. लोकांसाठी बहुतांश वेळा सुरुवात ही शून्यापासून होते. पण काम करणं त्यांचा नाईलाज असतो. आपल्या कुटुंबासाठी, पत्नीसाठी, मुलांसाठी, वृद्ध मातापित्यांसाठी, अवलंबून असणाऱ्या भावंडांसाठी लोकांना कमवावं लागतं. एखाद्याला त्याच्या घरापासून, कुटुंबीयांपासून दिवसभर, बऱ्याचदा अनेक दिवस, आठवडे लांब ठेवून पगाराच्या आशेवर काम करायला लावणं. आम्ही हे गृहीत धरलंय की असं करणं बरोबर आहे. कारण गेल्या २५०हून अधिक वर्षांपासून हे असंच चालत आलं आहे. अशाच पद्धतीने राष्ट्रउभारणी होत असते. त्यामुळे आम्हीही ते करतो”, असा मुद्दाही शांतनू देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.