…तर जगातली सगळ्यात पुढारलेली जात मराठा असती

0
209

धाराशिव, दि. १६ (पीसीबी) – मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारपासून राज्यभरात दौरा सुरू केला. सकाळी अंतरवाली सराटी येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून रात्री धाराशिवमध्ये जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी ७० वर्षांची मराठा समाजाची सल बोलून दाखवली.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, ‘तुम्हीच खोडीचे आहात. तुम्ही नेत्यांच्या तीन-तीन पिढ्या मोठ्या केल्या. त्यांच्या पोरांना तुम्ही साहेब म्हणता; परंतु आपल्या पोरांना त्यांची काहीच मदत झाली नाही. ७० वर्षांमध्ये ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या आता सापडत आहेत.
२४ डिसेंबरला कायदा पारित होणार आणि मराठ्यांना ५० टक्क्यांच्या आतमध्येच आरक्षण मिळणार आहे.’ ते पुढे म्हणाले, ७० वर्षांमध्ये मराठ्यांना आरक्षण असते तर जगातली सगळ्यात सुधारित आणि पुढारलेली जात मराठा असती.
आजपर्यंत कोणी या नोंदी दडवून ठेवल्या होत्या, कुणामुळे ७० वर्षे मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही? याचे उत्तर मिळाले पाहिजे. नेत्यांची पोरे परदेशातून शिकून येतात. त्यांना आपण साहेब करतो, मात्र तेच आज मराठ्यांना विरोध करत आहेत. त्यांना आयुष्यभर मराठे गुलाल लागू देणार नाहीत. आता सगळ्यांनी एकजुटीने पुन्हा एकत्र यायचे आहे आणि गावागावांतल्या मराठ्यांना जागरूक ठेवायचे आहे.
धाराशिवमध्ये सकाळी अकरा वाजता सभा होती. तरी रात्री आठ वाजल्यापासून लोक वाट बघत आहेत, याचा अर्थ सरकारला आता आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. मी मरायला भीत नाही, मला काही झाले तर हे आग्या मोहोळ त्यांचे काय करेल.

ओबीसी बांधवांना आता हे कळायला लागल आहे आणि दलित बांधवांनाही लक्षात आले आहे की, मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या आहेत; याचा अर्थ त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. म्हणून ते नेत्यांनाही सांगत आहेत, विरोध करू नका.