…तर चीन च्या मालावर अमेरिका लावणार ५० टक्के आयात शुल्क

0
29

अमेरिकेने व्यापार कर लादल्याने अनेक देशांवर त्याचा परिणाम झाल आहे. अनेक देशातील भांडवली बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत असून अनेक कंपन्यांना अमेरिकेत व्यापार करणे कठीण बनले आहे. अमेरिकेच्या खेळीवर चीननेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवर ३४ टक्के आयात शुल्क लादले. हे आयात शुल्क मागे घेण्याकरता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला अल्टिमेटम दिला असून असे न केल्यास चीनवर ९ एप्रिलपासून ५० टक्के आयात शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या या इशाऱ्याला आता चीननेही प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच, “टॅरिफ ब्लॅकमेल”ला चीन घाबरणार नाही, असंही चीनने म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर देताना, चीनने म्हटले आहे की ते स्वतःचे हक्क आणि हितसंबंध जपण्यासाठी दृढनिश्चयाने प्रतिकारक उपाययोजना आखले जातील. “चीनविरुद्ध शुल्क वाढवण्याची अमेरिकेची धमकी ही एक चूक आहे. यामुळे अमेरिकेची ब्लॅकमेलिंगची सवय पुन्हा एकदा स्पष्ट होतेय”, असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. “जर अमेरिकेनेआयात शुल्क मागे घेतले नाहीत तर चीन शेवटपर्यंत लढेल,” असे मंत्रालयाने पुढे म्हटले आहे.

आयात शुल्कावरून वाटाघाटी करण्यास चीनने प्रयत्न सुरू केले आहेत. आम्ही संवाद आणि सहकार्याद्वारे वाद सोडवण्याचा सल्ला देऊ, असं मंत्रालयाने म्हटलं. “पण आम्ही आमच्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे रक्षण करण्यास मागेपुढे पाहणार नाही”, असा इशाराही चीनने दिला.

चीनने अमेरिकेच्या उत्पादनावर ३४ टक्के कर आकारला होता. हा कर चीनने मागे घेतला नाही तर तिढा निर्माण होईल, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडियाद्वारे इशारा दिला होता. “जर चीनने माघार घेतली नाही तर… अमेरिका अतिरिक्त कर लादेल”, असे ट्रम्प म्हणाले आणि चालू असलेल्या सर्व व्यापार वाटाघाटी स्थगित करण्याची धमकीही दिली. तसंच, अमेरिकेने लादलेल्या कराविरोधात अमेरिकन उत्पादनावर कर लादेल, त्यांच्यावर तत्काळ नवीन आणि जास्त लक्षणीयरित्या कर लादला जाईल, अशी धमकीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. सध्याच्या अमेरिकेच्या शुल्क उपाययोजनांमुळे चीनी आयातीवर एकूण ५० टक्के शुल्क आकारले गेले आहेत.