(पीसीबी) दि. 20 : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत तीन महत्त्वाची विधेयके मांडली. संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, जम्मू-काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक आणि केंद्रशासित प्रदेशांचे सरकार (सुधारणा) विधेयक अशी या तीन विधेयकांची नावे आहेत. या विधेयकांमध्ये मोठा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. जर विद्यमान मंत्री, मुख्यमंत्री किंवा अगदी पंतप्रधान यांना पाच वर्षे किंवा त्याहून अधिक तुरुंगवासाच्या शिक्षेचा गुन्हा ठरला आणि सलग ३० दिवस अटक किंवा ताब्यात ठेवले गेले, तर त्यांना एका महिन्याच्या आत पद सोडावे लागेल, अशी तरतूद यात आहे.
या विधेयकानुसार, पदावरून बडतर्फ झालेल्या व्यक्तीला कोठडीतून सुटका झाल्यानंतर पुन्हा त्या पदावर नियुक्त केले जाऊ शकते. या तरतुदीमुळे सत्तेत असलेल्या नेत्यांवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या विधेयकांवरून लोकसभेत तीव्र राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.
विधेयके मांडल्यानंतर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी कडाडून विरोध दर्शवला. त्यांनी म्हटले की, हे विधेयक अधिकारांच्या पृथक्करणाचे उल्लंघन करते आणि निवडून न आलेल्या लोकांना “जल्लाद” बनवण्याचा प्रयत्न आहे. तसेच या तरतुदी सरकारांना अस्थिर करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. “हे विधेयक म्हणजे गेस्टापो निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,” अशी टीका करत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
ओवैसी यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहातील वातावरण तापले आणि गोंधळ वाढला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसल्याने लोकसभा दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.
केंद्र सरकारने मांडलेली ही तीन विधेयके पूर्णपणे नवीन कायदेशीर चौकट प्रस्तावित करतात. या विधेयकांची अंमलबजावणी झाल्यास केंद्र व राज्य सरकारांच्या कारभारात मोठे बदल घडू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
दरम्यान, याच बैठकीत केंद्राने रेशन कार्डधारकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. देशभरात १.१७ कोटी लोकांची नावे रेशन कार्ड यादीतून वगळली गेल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे लाखो कुटुंबांवर याचा थेट परिणाम होणार असल्याचे संकेत आहेत.
लोकसभेत मांडलेली ही विधेयके आणि रेशन कार्डधारकांवरील निर्णय यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.