पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील 8 क्षेत्रीय कार्यालय निहाय रस्ते व गटर साफसफाई करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना कंत्राटदार वेळेवर वेतन देत नसल्याची वारंवार ओरड होती. अनेक वेळा हे कर्मचारी पालिकेच्या प्रवेशव्दारासमोर आंदोलनास बसल्याचे वारंवार प्रकार घडले होते. त्यामुळे आता महापालिकेच्या आरोग्य विभागाने कठोर भूमिका घेत 10 तारखेपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन न केल्यास कंत्राटदारास 25 हजार रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
महापालिकेच्या विविध विभागात ठेकेदाराच्या मार्फत कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची कंत्राटदार पिळवणूक करतात, याची ओरड होती. तसेच या कामगारांचे वेतन 20 ते 25 तारखेपर्यंत होत नव्हते. याबाबत रयत विद्यार्थी परिषदेसह विविध संघटनांनी आरोग्य विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. याची दखल घेऊन आरोग्य विभागाने कंत्राटदाराने दहा तारखेपर्यंत कंत्राटी कामगारांचे वेतन केले नाही तर कंत्राटदारास प्रतिदिन 25 हजार रूपयांचा दंड आकारण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
यापूर्वी अशी कोणतीही तरतूद नव्हती. या कारणामुळे कामगारांचे वेतन 25 तारखेपर्यंत होत नव्हते. याचा गैरफायदा घेऊन कामगारांची आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर आरोग्य विभागाने कठोर भूमिका घेऊन कंत्राटी कामगारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. सर्व कामगार दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा निर्णय मानला जातो. या निर्णयापासून कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराला चाप बसेल अशी आशा रयत विद्यार्थी परिषदेचे सूर्यकांत सरवदे यांनी व्यक्त केली आहे.