…तर आर्थिक स्थिती दीर्घकालीन स्वरुपात सुधारेल – अच्युत गोडबोले

0
337

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज विविध पायाभूत सुविधांमध्ये अपेक्षित खर्च करून त्या सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवल्यास आर्थिक स्थिती दीर्घकालीन स्वरुपात सुधारेल असे मत प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  विविध उपक्रमांचे  आयोजन  करून साजरा करण्यात येत आहे. या निमित्त दि. १३ ऑगस्ट  ते २१ ऑगस्ट २०२२ दरम्यान साहित्य अमृत ग्रंथोत्सव व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचा समारोप  प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले यांच्या व्याख्यानाने करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, महारष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजन लाखे, उमेश पाटील यांच्यासह विद्यार्थी, नागरिक  आदी उपस्थित होते.

अच्युत गोडबोले म्हणाले,  भारतीची आर्थिक स्थिती ही अत्यंत बिकट आहे,  यासाठी केवळ सध्याचे सरकार जबाबदार नसून जागतिकीकरणाचा योग्य पद्धतीने स्वीकार न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जागतिकीकरणाचे अनेक फायदे झाले. निम्न मध्यमवर्ग मध्यमवर्गात गेला, मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्गात गेला, मात्र ही प्रगती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचली नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि आर्थिक विषमता निर्माण झाली,  बेरोजगारी आणि अर्ध बेरोजगारी निर्माण झाली, प्रगती ठराविक शहरांपर्यंत मर्यादित राहिली, जीडीपी वाढीच्या तुलनेत अपेक्षित रोजगार निर्मिती झाली नाही,  त्यामुळे भारताची आर्थिक परिस्थिती बिकट झाली.  जागतिकीकरणाचे तोटे आणि फायदे दोन्ही झाले.  

पूर्वेकडील देशांनी शिक्षण, आरोग्य, संशोधन यावर मोठ्याप्रमाणात खर्च केल्याने ते आज चांगल्या स्थितीत आहेत.  या परिस्थितीतून भारताला बाहेर येण्यासाठी शिक्षण, आरोग्य, संशोधन, पायाभूत सविधा या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल. त्या सुविधा तळागळातील लोकांपर्यंत पोहचवल्यास भारत नक्कीच चांगल्या स्थितीत येईल. त्याचे लवकरच  दीर्घकालीन सकारात्मक परिणाम दिसून येतील.

आर्थिक विषमता ही लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे, विषमता असेल आर्थिक संकट येऊ शकते.   शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अपेक्षित खर्च करून सामाजिक पायाभूत सुविधानिर्माण केल्यास  विषमता कमी होण्यास मदत होईल.  सामाजिक पायाभूत सुविधा निर्मितीमुळे भारत प्रचंड प्रगती करेल असेही ते म्हणाले महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साहित्य अमृत ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमालेचा समारोप आज करण्यात आला.