…तर अजित पवार हे आगामी मुख्यमंत्री असतील

0
270

मुंबई, दि. १० (पीसीबी) – राज्यात २०१९ साली भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्रित येत महाविकास आघाडीचा राबविण्यात आला होता.यावेळी अनपेक्षितपणे उध्दव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अडीच वर्ष एकत्र सरकार चालवलं. पण शिंदेंसह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर आघाडी सरकार कोसळलं आणि ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. आता त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. परंतू, आता आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार यावरुन या नेत्यानं केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

शिंदे फडणवीस सरकार कोसळणार की राहणार यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांकडून वारंवार उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात असतात. याचवेळी मध्येच मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरुनही महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गटात जोरदार चर्चा झडत असतात. मध्यंतरी उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याबाबत वक्तव्यं केलं होतं.आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार निलेश लंकेंनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर मोठं भाष्य करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.

फडणवीसांशी आमच्या गुप्त चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या विधानाने तर्क-वितर्कांना उधाण!
भाजप नेत्यांनी २०२४ ला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील असं जाहीरपणे सांगितलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावरच शिक्कामोर्तब केलेलं आहे. आता फडणवीस आणि शिंदेंच्या प्रबळ दावेदारीनंतर महाविकास आघाडीकडूनही अनेक नावांची चर्चा आहे. यात उध्दव ठाकरे यांचं नाव आघाडीवर आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला जाण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार निलेश लंके यांनी केलेलं वक्तव्य आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके म्हणाले, आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचंय. मी माझ्या बऱ्याच भाषणांत सांगतो, अजित पवारांना फक्त पाच वर्षं मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर आपलं राज्य २५ वर्षं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही हा खात्री आहे. पण आता फक्त व्यासपीठावर बोलण्यापेक्षा दादांची काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचवण्याचं काम येत्या वर्षभरात करायचं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यामुळे राज्यातला विकासाचा थांबलेला गाडा घराघरांत पोहोचवणं गरजेचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंकेंनी यांनी एका जाहीर कार्यक्रमात अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी आत्तापर्यंत मविआतील तिनही पक्षांनी विधानसभा निवडणुका सोबतच लढण्याच्या आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल, तर ते संपूर्ण महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरू शकतील असंही रोखठोक मत व्यक्त केलं आहे.