…तर अजित गव्हाणे आमदार महेश लांडगेंना जड जाणार

0
182

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी आणि चिंचवडसोबतच भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रात होतो. भोसरीत पिंपरी आणि चिंचवडप्रमाणे महायुतीत खडा पडण्याची प्रत्यक्ष चिन्हे दिसत नसली तरी भोसरीचे वर्तमान आमदार महेश लांडगे यांना यावेळी अस्मान दाखवण्यासाठी अजित पवार गट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ताकद देणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपा २०१४ मध्ये देशात सत्तेत आल्यानंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे चिंचवडमधून कमळाच्या चिन्हावर निवडून आले. भाजपची लाट असतानाही आमदार महेश लांडगे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये ते भाजपच्या तिकिटावर येथून विजयी झाले. त्यापूर्वी महापालिकेच्या २०१७ च्या महापालिका निवडणुकीत आमदार जगताप आणि लांडगे या जोडीने अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका एकहाती काबीज केली होती. ७२ हून अधिक नगरसेवक निवडून आणत महापालिका ताब्यात घेताना दोन्ही आमदारांनी अजित पवार यांना धूळ चारली होती. पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी अजित पवार यांनी विशेष लक्ष घातले होते. त्यांनी येथील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून दिला होता. २०१७ पूर्वी राज्यातील सभांमध्ये नियोजन आणि विकासकामांबद्दल बोलताना ते पिंपरी-चिंचवड शहराचा उल्लेख हमखास करायचे. २०१७ ला लांडगे आणि जगताप यांनी अजित पवार यांना मोठा धक्का देताना त्यांची ड्रीम सिटी ताब्यात घेतली. आता सध्या महायुतीत अजित पवार नको, असा भाजपमध्ये दबक्या आवाजात असलेला मतप्रवाह आता वाढत आहे. अशा स्थितीत महापालिका निवडणुकीतील पराभवाचा वचपा यावेळी काढण्यासाठी भोसरीत विशेष प्रयत्न होणार असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती असली तरी अजित पवार गट भोसरीत लांडगे यांना आणि चिंचवडमध्ये जगताप कुटुंबातील उमेदवाराला क्रॉस वोटिंग करण्यासाठी ताकद पणाला लावू शकतात, अशी शक्यता आहे. अजित गव्हाणेंनी अजित पवार गटाचे शहराध्यक्षपद असतानादेखील पक्षाची साथ सोडली आणि शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. अजित गव्हाणे हे महाविकास आघाडीमधून भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षासाठी कोणता मतदारसंघ सोडला जाणार, हे अद्याप निश्चित नाही. मात्र गव्हाणे हे सुरुवातीपासून अजित पवार यांचे भोसरीतील खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. गव्हाणे आज शरदचंद्र पवार गटामध्ये गेले त्यामागे भोसरी विधानसभा निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षा हेच त्यामागील मुख्य कारण आहे.

अजित गव्हाणे यांना शरद पवार गटाने आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात तिकीट दिल्यास येथील सामना कमालीचा रंगतदार होणार, हे निश्चित आहे.

२०१७ मधील महापालिका निवडणुकीतील उट्टे काढण्यासाठी अजित पवार गट गव्हाणे यांना छुपा पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास अजित गव्हाणे हे आमदार महेश लांडगे यांना विधानसभा निवडणुकीत जड ठरू शकतात. या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘सीविक मिरर’ ने आमदार महेश लांडगे आणि अजित गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.