तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दि.२७(पीसीबी)-सहकारी तरुणीची सहानुभूती मिळवण्यासाठी तरुणाने तिला मदत करत असल्याचा बनाव केला. दरम्यान, त्याने एआयचा वापर करून तरुणीचे अश्लील फोटो बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच प्रकरणात त्याने तरुणीला पोलीस ठाण्यात जाण्यास, तक्रार देण्यास देखील मदत केली. मात्र तरुणाचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याला अटक केली.
सुदर्शन सुनील जाधव (२५) हा चाकण येथे राहत असून तो मूळचा वाशीम येथील आहे. तो चाकण येथे एका खासगी कंपनीत काम करतो. त्याच्यासोबत काम करणाऱ्या २० वर्षीय तरुणीकडे त्याने प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र तरुणीने त्याला नकार दिला होता. त्या रागातून त्याने तरुणीचे चोरून फोटो काढले. सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार केले. त्यावरून तरुणीला अश्लील मेसेज पाठवले. तसेच एआयचा वापर करून तरुणीचे अश्लील फोटो तयार केले. ते फोटो आणि मेसेज तरुणीला पाठवले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तरुणीला त्याने धमकी दिली.
सुदर्शन जाधव एवढ्यावर थांबला नाही. तरुणीने विश्वासाने तिला आलेल्या धमकी बाबत त्याला सांगितले. सुदर्शन हा पीडित तरुणीला घेऊन चिखली पोलीस ठाण्यात आला. पोलिसात तक्रार करण्यासाठी त्याने तरुणीची मदत केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभार्य लक्षात घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे सायबर पोलिसांना आदेश दिले. सायबर पोलिसांनी सोशल मीडिया कंपन्या आणि मोबाईल कंपन्यांकडे पत्रव्यवहार करून संबंधित मोबाईल क्रमांक धारकाची ओळख पटवली.
पोलिसांनी संशयित मोबाईल क्रमांक धारकाकडे चौकशी केली असता त्याचा मोबाईल फोन मागील काही दिवसांपूर्वी हरवला असून त्याने त्याबाबत पोलिसात तक्रार केल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया अकाउंट वापरलेल्या डिव्हाईसचा आयपी अड्रेस काढून नवीन मोबाईल क्रमांक मिळवला. त्याआधारे सुदर्शन जाधव याला त्याच्या खोलीतून ताब्यात घेण्यात आले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत खरात, सुभाष पाटील, प्रवीण शेलकंदे, वैशाली बर्गे, स्वप्नील खणसे यांनी केली.











































