…तरच आयुष्यात यशस्वी होता येते; परिसंवादात उमटला सूर

0
431

पिंपरी दि.५ (पीसीबी) – शिकण्याची आवड, आस आणि जिद्दीने पुढे जाण्याची आकांक्षा असेल तरच आयुष्यात यशस्वी होता येते. शिक्षण हे  विकासाचेद्वार असून सत्य आणि स्वाभिमानाच्या सूर्याची जाणीव जेव्हा होईल, तेव्हाच शैक्षणिक आणि आर्थिक विकासाची सूत्रे सापडतील, असा सूर प्रबोधन पर्वाच्या परिसंवादात उमटला. 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळच्या बसस्थानका शेजारील प्रांगणात विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. विचार प्रबोधन पर्वाच्या चौथ्या दिवशी  “मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाची सूत्रे’’ या विषयावर परिसंवाद पार पडला. यावेळी आष्टी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब शिंदे, ज्येष्ठ पत्रकार जयंत जाधव, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड हे सहभागी होते.

 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब शिंदे म्हणाले, महापुरुषांनी शिक्षणाची दारे खुली केली. स्वतः शिक्षण घेऊन इतरांनाही शिक्षण घेण्यासाठी मदत केली तर स्वतःबरोबरच इतरांचाही विकास होईल. आयुष्यभर विद्यार्थी बनून राहिले तर खूप गोष्टी आत्मसात करता येतात. मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याचा ध्यास मनात ठेवणे गरजेचे आहे. तसेच एकजुटीने आणि सहकार्याने काम केले तर त्यातून मोठा व्यवसाय उभा करता येऊ शकतो, असे मत शिंदे यांनी मांडले.

ज्येष्ठ पत्रकार जयंत जाधव म्हणाले, फक्त संघर्ष न करता शिक्षणाचा दिवा सतत तेवत ठेवल्यास एक दिवस त्याचे यशाच्या सूर्यात रुपांतर होते. महापुरुषांच्या लिखाण, कार्य आणि विचारांतून प्रेरणा घेऊन स्वतःमधील क्षमता आणि कौश्यल्य ओळखून त्यातून रोजगार निर्माण करावा. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा देखील वापर करावा, असे त्यांनी सांगितले.

  महापुरुषांच्या विचारांनी एकजुटीने, समूहाने आणि सहकार्याने लढण्याची ताकद निर्माण होते. तसेच प्रत्येक व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन ठळक होतो. एका व्यक्तीपासून दुसरया व्यक्तीला शिक्षणाची प्रेरणा मिळावी, यासाठी महापुरुषांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण असून स्वाभिमान हे परिवर्तनाचे सूत्र आहे, असे मत महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी व्यक्त केले.