तब्बल ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र तयार; आता कोणत्याही वेळी होणार मालमत्ता जप्तीची कारवाई !

0
88

– जप्ती अधिपत्र सादर केलेल्या मालमत्तांकडे २३४ कोटींची थकबाकी

पिंपरी, दि. ७ – चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ६ लाख ३३ हजार २९४ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ५ लाख ४१ हजार १६८ निवासी मालमत्ता, ५७ हजार ७३३ बिगरनिवासी, ४ हजार ५६३ औद्योगिक, ११ हजार ३२३ मोकळ्या जमिनी, १६ हजार १ मिश्र आणि २ हजार ५०६ इतर इतक्या मालमत्ता आहेत. चालू आर्थिक वर्षामध्ये आत्तापर्यंत एकूण ४ लाख ०२ हजार मालमत्ताधारकांकडून ५६५ कोटी रुपयांचा मालमत्ताकर महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये जमा करण्यात आला आहे. एकूण मालमत्ताधारकांपैकी अद्याप २ लाख २२ हजार ६५६ इतक्या मालमत्तांची थकबाकी आहे. थकीत कराची वसुली करण्यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागाने सर्व विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची थकबाकी वसुली कार्यवाहीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रत्येक प्रकरणांचा आढावा घेण्यात आला व थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचअनुषंगाने, सर्व विभागातील थकबाकी असलेल्या ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले आहे. अशा अटकावणी व जप्ती अधिपत्राद्वारे थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यासाठी करसंकलन विभागाच्या विभागीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी यांना नेमण्यात आले आहे. सदर जप्ती अधिपत्राच्या आधारे कर संकलन विभागाच्या विभागीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी यांना ‘नमुना ह’ च्या जप्ती अधिपत्राद्वारे मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ज्या मालमत्ता संदर्भात जप्ती अधिपत्र काढणेत आले आहे अशा मालमत्तांची आता कोणत्याही वेळी मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार कर संकलन विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

ज्या मालमत्तांचे नमुना ‘ह’ प्रमाणे अटकावणी किंवा जप्ती अधिपत्र काढण्यात आले आहेत अशा मालमत्तांना मालमत्ताकराच्या बिलासोबतच जप्ती पूर्व नोटीस बजाविण्यात आली होती. परंतू तरी सुध्दा सदर मालमत्तांनी विहित कालावधीमध्ये थकीत कराचा भरणा न केल्याने अशा थकीत मालमत्तेच्या थकीत रकमेच्या किमतीची जंगम मालमत्ता अटकावून ठेवावी किंवा थकीत मालमत्तेच्या जागेवरील कोणतीही स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश व अधिकार कर संकलन विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना करसंकलन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

करसंकलन विभागाकडून १५ विभागीय कार्यालयामधील ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आलेल्या मालमत्तांकडे २३४.३१ कोटींची थकबाकी असून २८.१९ कोटींची चालू मागणी अशी २६२.५० कोटींची एकूण मागणी आहे. याच अनुषंगाने मोशी विभागीय कर संकलन कार्यालयाकडून तात्काळ कार्यवाही सुरु करण्यात आली असून स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून शहरातील इतर विभागीय कर संकलन कार्यालयाकडूनसुध्दा थकबाकीदारांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

त्याचबरोबर, मालमत्ता जप्ती सोबतच आता थकबाकीदारांच्या मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई करण्यात यावी, असेसुध्दा आदेश कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत प्रत्येक विभागीय कार्यालयास देण्यात आले आहेत. थकीत मालमत्ताकरावर प्रतिमहिना दोन टक्के विलंब शुल्क वाढत असून मालमत्ताधारकांनी तात्काळ आपल्या कराचा भरणा करावा. असेही आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

“ज्या मालमत्ता जप्तीस पात्र आहेत अशा ५०५९ मालमत्ता जप्ती अधिपत्राद्वारे तात्काळ जप्त करण्याचे आदेश संबधित विभागीय कार्यालयांना देण्यात आलेले असून उपरोक्त आदेशाच्या आधारे विभागीय कर संकलन कार्यालयाने जप्तीची कारवाई सुरु केलेली आहे. विशेषत: ज्या मालकांनी आपली निवासी मालमत्ता आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या अनुषंगाने भाडे तत्वावर दिलेल्या आहेत, तसेच मिश्र व व्यावसायिक कारणांसाठी वापरात असलेल्या मालमत्ता संदर्भात प्राधान्याने जप्ती करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सबब, ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करुन महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळावी.”, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग विनाश शिंदे यांनी केले आहे