दि.५(पीसीबी)- अनंत चतुर्दशीपूर्वी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला गुरुवारी (ता. ४) संध्याकाळी त्यांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
एका मोबाईल क्रमांकावरून पाठवलेल्या या संदेशात शहरातील विविध वाहनांमध्ये मानवी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच, हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा वापर करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले.वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर हा धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे. या संदेशात ३४ वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, ४०० किलो आरडीएक्समुळे १ कोटी लोक मृत्युमुखी पडतील असं म्हटलं आहे.
‘लश्कर-ए-जिहादी’ या संघटनेचे १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरक्षा उपाययोजना अधिक कडक केल्या असून मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. गणेशोत्सव काळात नेहमीच मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त खबरदारी घेतली जाते.