तब्बल २५ किलो सोन्याचे दागिने घालून पिंपरी चिंचवडचचे कुटुंब बालाजी दर्शनाला

0
94

गोल्डमॅन सनी वाघचौरे आणि संजय गुर्जर यांचा व्हिडीओ व्हायरल

पिंपरी, दि. २४ – आंध्र प्रदेशमधील तिरूपती देवस्थानाला दररोज हजारोंच्या संख्येनं भाविक भेट देत असतात. यावेळी देवस्थानाला भाविकांकडून देण्यात येणाऱ्या दानाची रक्कम काही कोटींमध्येही गेल्याचं पाहायला मिळालं आहे. पण एक कुटुंब चक्क कोट्यवधींचं सोनं अंगावर घालून तिरुपती देवस्थानात दर्शनासाठी गेल्याचं दिसून आलं आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ पीटीआय वृत्तसंस्थेनं शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे. हे कुटुंब पुण्यातलं असल्याचंही पीटीआयच्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सच्याही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पिंपरी चिंचवडचे सनी वाघचौरे आणि संजय गुर्जर तसेच एक महिला आहे. महिलेने सोनेरी साडी आणि नखशिखांत दागिने परिधान केले आहेत. सनी आणि संजय यांना गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाते.


पीटीआयनं पोस्ट केलेल्या या व्हिडीओसह त्याबाबतची माहितीही देण्यात आली आहे. व्हिडीओतील पुणेकर कुटुंब तब्बल २५ किलो सोनं अंगावर घालून तिरुपती देवस्थानला दर्शनासाठी पोहोचल्याचं त्यात म्हटलं आहे. हा व्हिडीओ २३ ऑगस्ट रोजी पोस्ट झाला असून त्याच दिवशी हे कुटुंब दर्शनासाठी तिरुपती देवस्थानला गेल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
या व्हिडीओमध्ये दोन पुरुष, एक महिला व एक लहान मूल दिसत आहेत. पुरुषांच्या गळ्यात आणि हातात सोन्याचे भरगच्च दागिने दिसत आहेत. त्याचवेळी त्यांच्यासह चालणाऱ्या महिलेच्या अंगावरही अनेक सोन्याचे दागिने आहेत. एका व्यक्तीच्या गळ्यात इंग्रजीत 7 क्रमांकाची साखळी असून दुसऱ्या व्यक्तीच्या गळ्यात ‘नाना’ असं लिहिलेली साखळी दिसत आहे. या सोन्याचं वजन जवळपास २५ किलो असून त्याची किंमत तब्बल १८ कोटींच्या घरात असल्याचंही सांगितलं जात आहे