मुंबई, दि. २८ : टाटा ग्रुप, देशातील सर्वात मोठा औद्योगिक समूह असून या शेकडो वर्ष जुन्या समूहाच्या बिझनेसचे मूल्य सुमारे 180 अब्ज डॉलर्स आहे. TATA म्हणजे विश्वास असा सामान्य लोकांचा समज आहे आणि वर्षानुवर्षांपासून याचे उदाहरण दिले जात आहे पण, अलीकडच्या घडामोडींमुळे हा विश्वास डळमळीत होऊ लागला आहे असं दिसत आहे.
सर्वप्रथम गेल्या महिन्यात एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले तर आता देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी, TCS, ने जागतिक पातळीवर 12000 कर्मचारी कपात करण्याची घोषणा करून लोकांना जबरदस्त धक्का दिला.
एअर इंडिया विमान दुर्घटना अद्यापही कोणी विसरू शकलेलं नसून आता TCS च्या हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार असताना टाटा ग्रुपशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष N Chandrasekaran यांच्या पगार पॅकेजमध्ये मोठी वाढ झाली आहे. चंद्रशेखरन यांच्या पगारात वर्षभरात इतकी वाढ झाली की रतन टाटांच्या जवळचे मानल्या जाणारी ही व्यक्ती आता देशातील सर्वाधिक पगार घेणारे कार्यकारी अधिकारी बनली आहे.
चंद्रशेखरन यांच्या वेतनात गेल्या वर्षाच्या तुलनेत 15% पेक्षा जास्त वाढ झाली असून आता त्यांचे वेतन 155.81 कोटी रुपये झाले आहे. त्याचवेळी दुसरीकडे, टीसीएस कंपनीतील 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासह एन. चंद्रशेखरन भारतातील सर्वाधिक वेतन घेणारे कार्यकारी अधिकारी ठरले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी टाटा मध्ये एक ट्रेनी म्हणून सुरुवात केली होती तर आज त्याच कंपनीचे अध्यक्ष बनले आहेत.
एन. चंद्रशेखरन यांना 15.1 कोटी रुपये पगार आणि नफ्यातील कमिशन म्हणून 140.5 कोटी रुपये मिळाले असून कंपनीच्या नफ्यातील त्यांचे कमिशन 0.4 टक्क्यांवरून 0.6% पर्यंत वाढले आहे. टाटा समूहाच्या कमाईत टीसीएस, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील यांसारख्या कंपन्यांचे मोठे योगदान असून सध्या टाटा समूहाचे मार्केट कॅप 30.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दिवंगत रतन टाटा पायउतार झाल्यावर चंद्रशेखरन यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती आणि त्यानंतर त्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे. 2018 मध्ये त्यांचा पगार 55 कोटी रुपये होता.