तब्बल सव्वा लाख मोरया भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ;श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

0
2

दि.१२(पीसीबी)- चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६४ व्या संजीवन समाधी महोत्सवाची बुधवारी (दि. १० डिसेंबर) उत्साहात सांगता झाला. “मोरया! मोरया!”च्या जयघोषात समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी होत असताना, महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली. या पावन प्रसंगी तब्बल सव्वा लाखहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

दरवर्षी भव्य स्वरूपात साजरा होणारा हा महोत्सव यंदा ६ ते १० डिसेंबरदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांनी उजळून निघाला. सुगम संगीत मैफली, जुगलबंदी, व्याख्यानमाला, योगासन वर्ग, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र व दंत चिकित्सा, सनई-चौघडा वादन, श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सौरयाग, अभंगवाणी संगीत रजनी अशा अनेक कार्यक्रमांनी देऊळमळा परिसर भक्तिभावाने निनादत होता. भक्तांच्या सोयीसाठी पटांगणावर विशाल मंडप उभारण्यात आला होता.

महापूजा व नगर प्रदक्षिणा

मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांच्या हस्ते बुधवारी पहाटे साडेचार वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधीची महापूजा पार पडली. सकाळी सात वाजता समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर केरळी वाद्य पथक, वारकरी मंडळ आणि केशव शंखनाद पथकाच्या सहभागाने श्रीची नगर प्रदक्षिणा करण्यात आली. प्रदक्षिणेनंतर श्री पाटील सर यांनी नयनभारती गोसावी यांच्या समाधीसमोर मोरया चरित्र पठण केले.

ढोल-ताशा पथकाची मानवंदना

यावेळी चिंचवडमधील ढोलताशा पथकाने दिलेली मानवंदना वातावरणात भक्तीचा आणि जल्लोषाचा रंग भरून गेली. पुढे हरीभक्त पारायणकार प्रमोद महाराज जगताप यांनी काल्याचे कीर्तन सादर करून भक्तांना आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव दिला.

दुपारी १२ वाजता महाप्रसादास सुरुवात झाली आणि सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तो अखंड सुरू होता. या काळात सव्वा लाखहून अधिक भाविकांनी प्रसाद ग्रहण केला.

नयनरम्य आतषबाजीने उजळला मंदिर परिसर

सायंकाळी ६ वाजता श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, चिंचवडचा राजा यांनी गंगा आरतीचा दिव्य सोहळा सादर केला. रात्री ८ वाजता संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आतषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला. श्री मोरया गोसावी समाधी मंदिर आणि श्री मंगलमूर्ती वाडा येथे रात्री १० वाजता धूपारतीने महोत्सवाचा समारोप झाला.

‘मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष संपूर्ण परिसरात घुमत असताना, प्रत्येक भक्ताच्या मनाला एक वेगळेच आध्यात्मिक समाधान लाभत होते. विश्वस्त मंडळींच्या उत्तम नियोजनामुळे आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे ४६४ वा संजीवन समाधी सोहळा भाविकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेला.