तब्बल… दहा हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

0
290

पुणे, दि. १८ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील सुमारे दहा हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीसाठी पुण्यात सात हजार, पिंपरी-चिंचवडमध्ये साडेचार हजार, तर ग्रामीण भागात पाच हजारांपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असणार आहे.

पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून ही माहिती देण्यात आली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, ‘पुणे शहरात ३२२७ मतदान केंद्रे असून त्यापैकी ४३० मतदान केंद्रे बारामती मतदारसंघाची आहेत. सात हजार पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत. अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक यांवर विशेष लक्ष असणार आहे. १६ संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष असणार आहे.’

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडमध्ये मावळ आणि शिरूर हे लोकसभा मतदारसंघ येतात. या दोन मतदारसंघातील पिंपरी-चिंचवडमध्ये १८५४ मतदान केंद्रे आहेत. १ डिसेंबरपासून २५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. १३ जणांवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायदा, तर १८ जणांवर मोक्का लावण्यात आला असून ९९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ९५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. ३१ पिस्तूले, १७५ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. १२५ फरार गुन्हेगारांना अटक केली आहे. एक कोटी ८० लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त किंवा नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येत आहे. परवानाधारकांची शस्त्रे जमा करून घेण्यात येत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने ४५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असणार आहे.’

ग्रामीण भागात सहा हजार जणांवर कारवाई
ग्रामीण भागात शिरूर, मावळ आणि बारामती हे मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघातील ग्रामीण भागात ३१०२ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी पाच मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्म कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सहा हजार गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जानेवारीपासून आतापर्यंत २२ विनापरवाना पिस्तूल जप्त करण्यात आली असून आरोपींना अटक केली आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.