तबला नवाझउस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन

0
52

दि. १६ (पीसीबी) नवी दिल्ली-
तबल्याच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करणारे जगविख्यात उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार सुरु होते.त्यांना गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री उशिरा त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

झाकीर हुसैन यांच्या निधनाच्या वृत्ताने भारतीय संगीतविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कलाविश्वात या वृत्ताने शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध दिवंगत तबलावादक अल्लाह राखा खान त्यांचे वडील होते. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी झाकीर हुसैन यांनी तबला शिकण्यास सुरुवात केली. तर, वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी प्रत्यक्ष तबला वादनाचे कार्यक्रम घेतले.

झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन
सुमारे चार दशकांपूर्वी उस्ताद झाकीर हुसैन संपूर्ण कुटुंबासह अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थायिक झाले. बॉलिवूड आणि जगभरातील विविध भाषांच्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिलं. संगीत विश्वातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना 2002 मध्ये पद्म आणि 2023 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अशात त्यांची प्राणज्योत मालवल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. झाकीर हुसैन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला होता. वडील अल्लारखा यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांनी संगीत विश्वास मोठे नाव कमावले. त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता.