दि.०८(पीसीबी)-नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. यामुळे सध्या नाशिकमध्ये मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे. या वादात अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी उडी घेतली होती. त्यांनी तपोवनाला भेट देऊन वृक्षांची कत्तल करण्यास विरोध गेला होता. मात्र, या सगळ्यानंतरही राज्य सरकार साधूग्राम उभारण्यासाठी तपोवनातील झाडे कापण्याच्या निर्णयावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सयाजी शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.
सयाजी शिंदे हे सोमवारी सकाळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी आले. या दोघांमध्ये आता काय चर्चा होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नाशिकमध्ये मनसेनेही वृक्षतोडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि सयाजी शिंदे एकत्र येऊन तपोवनातील लढा आणखी तीव्र करणार का, हे बघावे लागेल.
यापूर्वी सयाजी शिंदे यांनी तपोवनातील लहान झाडंही तोडता कामा नये, अशी भूमिका घेतली होती. साधू आले, गेले तरी त्याने काही फरक पडत नाही. याविषयी माझा अभ्यास नाही. पण झाडं गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल. इथलं एकही झाड तुटता कामा नये. झाडं ही आपली आईबाप आहेत. आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही मुलं काही इतकी बुळगी नाही. आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही. गिरीश महाजनांनी यावर उत्तर दिले पाहिजे. ते जबाबदार व्यक्ती आहेत. आपली वैयक्तिक दुश्मनी नाही. दुश्मनी झाली तरी त्याने मला फरक पडत नाही, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले होते.
आम्ही नाशिकमध्ये 15 हजार झाडं लावणार आहोत. साधूग्राम येथे एकही झाड आम्ही तोडणार नाही. फक्त काही जी लहान झाडं आहेत ती कापावी लागतील. सयाजी शिंदे यांच्यासोबत सुद्धा माझी चर्चा झाली. मी जेव्हा हैदराबादला होतो तेव्हा त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांची भूमिका मी समजून घेतली. वेळ पडल्यास मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन त्यांचे आक्षेप समजून घेईन. वृक्षप्रेमी आणि राजकीय नेत्यांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. आधी आम्ही या वृक्षप्रेमींना 15000 झाडं दाखवू. त्यानंतरच आम्ही पुढे जे काही करायचं तो निर्णय घेऊ, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.
तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात आज नाशिक महापालिकेत महत्त्वाची बैठक होणार आहे. पर्यावरणप्रेमींचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांच्यात ही बैठक पार पडेल. दुपारी 12 वाजता महापालिका मुख्यालयात ही बैठक होईल. कुंभमेळानिमित्ताने साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील वृक्षतोड करावी लागणार, ही मनपा प्रशासनाची भूमिका ठाम आहे. मात्र, पर्यावरणप्रेमींचा या भूमिकेला विरोध आहे. तपोवनातील एकही झाड तोडून देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. गेल्या 15 दिवसांपासून याठिकाणी आंदोलन सुरु आहे.










































