तनिष्काच्या शोरुम दागिन्यांत फसवणूक, सांगितले ४.१४ कोटींचे निघाले ६५.७६ लाखांचे

0
631

पुणे, दि. ६ (पीसीबी) : पुणे शहरातील नामांकीत कंपनीच्या शोरुममधील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक कोट्यवधी रुपयांची आहे. ग्राहकाला 4.14 कोटी रुपयांचे हिऱ्याचे दागिने विकले गेले आहे. परंतु या दागिन्यांची किंमत फक्त 65.76 लाख रुपये निघाली. त्याच शोरुमच्या दुसऱ्या शाखेतून दागिन्यांची खरी किंमत उघड झाली. या प्रकरणी ग्राहकाने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे शहरातील लोणी काळभोर येथील स्वाती हेमंत हडके यांनी लक्ष्मी रोडवर असलेल्या तनिष्काच्या शोरुममधून हिऱ्यांचे दागिने खरेदी केले. या दागिन्यांची किंमत 4.14 रुपये होती. त्यासंदर्भातील बिलसुद्धा त्यांना देण्यात आले. डिसेंबर 2018 ते जानेवारी 2022 या कालावधीत एका योजनेचे सदस्यत्व त्यांनी घेतले होते. त्यामाध्यमातून हे हिऱ्यांचे दागिने घेण्यात आले.

मग जानेवारी 2023 मध्ये हे दागिने देऊन दुसरे नवीन दागिने घेण्याचा त्यांनी विचार केला. त्यासाठी ते परत शोरुममध्ये गेले. परंतु त्यांना टाळाटाळ करण्यात आली. वारंवार आग्रह करुनही त्यांचे ते दागिने घेतले जात नव्हते. यामुळे हडके यांनी तनिष्काच्या दुसऱ्या शाखेत ते दागिने दाखवले. त्यावेळी त्या दागिन्यांची किंमत फक्त 65.76 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. दागिने विक्रीतून त्यांची 3 कोटी ४८ लाखांत फसवणूक करण्यात आली.

तनिष्का शोरुममध्ये या प्रकाराची तक्रार गेली. त्यानंतर कंपनीने चौकशी केली. पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला. तनिष्का शोरुमकडून या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सहा जणांची भूमिका तपासली जात असल्याचे तनिष्का शोरुमच्या प्रवक्त्याने सांगितले. तक्रारदार हेमंत हडके यांनी सांगितले की, मुलीच्या लग्नासाठी आम्ही गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीची किंमत चार वर्षात 28 कोटी रुपये होईल, असे आम्हाला सांगितले होते. परंतु दागिने घेण्यास लक्ष्मी रोड शाखेकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे आम्ही हडपसर येथील तनिष्क ज्वेलरी स्टोअरमध्ये तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला.