तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

0
183

पिंपरी,दि. ३ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड कोणत्याही परवानगी शिवाय शहरात आला. तसेच त्याने शस्त्र बाळगले याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाने त्या गुंडाला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ) सायंकाळी पावणे आठ वाजता मेदनकरवाडी, चाकण येथे करण्यात आली.

अतुल हरिश्चंद्र तोत्रे (वय 27, रा. चाकण. मूळ रा. मोशी), सागर गणेश गायकवाड (वय 36, रा. पाबळ राजवाडा, ता. शिरूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश हिंगे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेदनकरवाडी, चाकण येथील भगतवस्ती येथे मोकळ्या मैदानात दोघेजण आले असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा लाऊन अतुल तोत्रे आणि सागर गायकवाड या दोघांना ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे 71 हजार रुपये किमतीचे दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी अतुल तोत्रे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 13 जानेवारी 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.