तडीपार गुंडाला पिस्टलसह अटक

0
464

दि २८ एप्रिल (पीसीबी ) – पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला दोन पिस्टलसह अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारासच साने चौक चिखली येथे करण्यात आली.

तुषार गौतम झेंडे (वय 26, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन मोरे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार झेंडे हा निगडी आणि पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 23 ऑगस्ट 2022 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. तसेच त्याने स्वतःकडे बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगले.

याबाबत गुन्हे शाखा युनिट एकला माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने तुषार झेंडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे दोन देशी पिस्टल आणि चार हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.