तंबाखू गाडीवर उडाल्याने दुचाकीला धडक; दोघेजण गंभीर जखमी

0
184

पुणे, दि. १३ (पीसीबी) – नारायणगाव जवळ जाधववाडी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या सहप्रवाशा कडून चुकून तंबाखू एका कारवर उडाली. या कारणावरून कार चालकाने दुचाकीला धडक देऊन दुचाकीवरील दोघांना गंभीर जखमी केले. ही घटना 19 मे रोजी घडली.

सुरेश विष्णू शिंदे (वय 65, रा. राजेवाडी, ता. आंबेगाव), अरुण तुकाराम खरात (रा. म्हसे जवळे, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुरेश शिंदे आणि त्यांचा भाचा अरुण खरात हे दुचाकीवरून नारायणगाव येथून बोरावके येथे जात होते. शिंदे यांना तंबाखू खाण्याची सवय असल्याने त्यांनी दुचाकीवर मागे बसून तंबाखू खाल्ली आणि थुंकले. ही तंबाखू पाठीमागून आलेल्या कारवर उडाली. त्या कारणावरून कार चालकाने जोरजोरात हॉर्न वाजवला. त्यामुळे अरुण खरात दुचाकी बाजूला घेत होता.

त्यावेळी कार चालकाने जोरात कार चालवून दुचाकीला धडक दिली. त्यात शिंदे आणि खरात दोघेही जखमी झाले. अपघात करून कार चालक पळून गेला. शिंदे यांच्या पायाचे, खुब्याचे हाड मोडले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पिंपरी मधील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.