लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनने आयोजित केलेल्या परिसंवाद विविध विषयांवर झाले विचारमंथन
पिंपरी, दि. २४ : तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होऊ लागले आहेत. कृत्रिम बुद्धिमता (एआय), ड्रोन सारखे तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञानातील नवनवीन कौशल्य युवकांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. पिंपरी चिंचवड महापालिका त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवत आहे, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनने महत्त्वाच्या भागीदार संस्था व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘भविष्यकालीन तंत्रज्ञानातील कौशल्य संधी – कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि संरक्षण तंत्रज्ञान’ या विषयावर निगडी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवाद मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.
नव्या तंत्रज्ञान क्षेत्रांतील वाढत्या गरजांसाठी योग्य कौशल्य विकास आणि सहकार्याच्या माध्यमातून पूरक उपाय तयार करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह म्हणाले, ‘ युवकांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीत एकही युवक मागे राहू नये, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका विविध उपक्रम राबवण्यास आगामी काळात प्रयत्नशील आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी अमृता बहुलेकर यांनी संस्थेचा व्यापक दृष्टिकोन मांडताना, युवकांसाठी चालविण्यात येणारे कौशल्यविकास कार्यक्रम तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीशी सुसंगत करण्याची तातडीची गरज अधोरेखित केली. संस्थेचे सहसंस्थापक व अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन यांनी भारतातील भविष्यकालीन कामगार बाजारपेठेचे दृश्य मांडताना सांगितले की, ‘२०२७ पर्यंत भारताला १२.५ लाख कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांची, दरवर्षी १ लाख प्रमाणित ड्रोन ऑपरेटर आणि जवळपास १० लाख सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची गरज भासणार आहे. ऑटोमेशनमुळे ३० टक्के एंट्री लेव्हल आयटी नोकऱ्यांवर परिणाम होणार असला, तरी एआय आधारित भूमिकांमध्ये १.६ पट वाढ होत आहे. दहावी उत्तीर्ण युवकांसाठी डेटा अॅनोटेशन आणि ड्रोन पायलटिंगसारख्या संधी निर्माण होत असून, पदवीधरांसाठी डेटा अॅनालिस्ट व ड्रोन टेक्निशियनसारखी नवीन पदे खुली होत आहेत.’
संस्थेच्या अध्यक्षा व सहसंस्थापक रुची माथूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुजा किशोर यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून सर्व युवकांसाठी समावेशक कौशल्यविकास आणि सार्वजनिक, खासगी भागीदारी मजबूत करण्याच्या फाउंडेशनच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनीही उपस्थित राहून युवकांसाठी कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान समाकलनासाठी संस्थात्मक पाठिंबा दर्शवला.
विविध विषयांवर परिसंवादात झाली चर्चा
‘युवकांच्या संदर्भात उदयोन्मुख नोकरी संधी व आवश्यक कौशल्ये’ या विषयावर देखील परिसंवाद चर्चा झाली. मानस अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थापक अनुप तांबे, डॉ.डी.वाय.पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाचे स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे डॉ.विशाल वडजकर, फ्लायजेन सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य वधोकर, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे बिझनेस ऑपरेशन्स विभागाचे संचालक राजेश खन्ना यांनी या परिसंवाद सहभाग घेतला. याशिवाय ‘युवकांसाठी भविष्यकालीन तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्य विकासाचे मार्ग निर्माण’ या विषयावर गटचर्चेचे आयोजन करण्यात आले. लाईटहाऊस टीमने हे सत्र संयोजित केले होते. या विषयावर विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी समावेशक कौशल्यविकासाचे शाश्वत मॉडेल तयार करण्यासाठी सामूहिक विचारमंथन केले. औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ अनिर्बान मुखर्जी, पृथजित बॉबी लाहिरी, रुपा रॉय यांनी युवकांसाठी उदयोन्मुख नोकरी संधी, जिज्ञासेवर आधारित शिक्षणाची गरज, स्वयं-अभ्यास प्लॅटफॉर्म्स आणि एआय व ड्रोन तंत्रज्ञानातील प्रारंभिक भूमिकांबाबत आपले विचार मांडले.
हा परिसंवाद शासकीय संस्था, शिक्षण क्षेत्र, उद्योग व नागरी समाज यांच्यातील सहकार्य वृद्धिंगत करून भारतातील युवकांना भविष्यकालीन करिअरसाठी सज्ज करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या लाइटहाऊस प्रोग्रामच्या संचालिका दीपिका केडिया यांनी केले. तर समारोप सहभागी गटांनी मांडलेल्या निष्कर्षांच्या सादरीकरणाने आणि सर्व मान्यवर, भागीदार व सहभागी सदस्यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.