ड्रग माफिया ललित पाटील नेपाळमध्ये

0
317

पुणे, दि. १२ (पीसीबी) : ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील नेपाळमध्ये पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पाटील याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. विशेष पथकासह गुन्हे शाखेची दहा पथके पाटीलच्या मागावर आहेत.

पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आल्यानंतर पाटील नेपाळमध्ये पसार झाल्याचा संशय व्यक्त केला. पाटीलचा शोध घेण्यात येत आहे. पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यासाठी देशातील अनेक तस्करांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात उघड झाली. दुबई, थायलंड आणि मलेशिया या देशात पाटील हा मेफेड्रोन पाठवित होता. मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिक परिसरातील शिंदे गावात पाटीलचा भाऊ भूषण याच्या कारखान्यावर छापा टाकला. मुंबई पोलिसांनी ३०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले.

या कारवाईनंतर भूषण उत्तर प्रदेशात पसार झाला. गोरखपूर भागात नेपाळ सीमेजवळ भूषण असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाल्यानंतर पुणे पोलिसांचे विशेष पथक तेथे रवाना झाले. एका लॉजमधून भूषण आणि अभिषेकला ताब्यात घेण्यात आले. दोघे नेपाळला पसार होण्याच्या तयारीत होते. उत्तर प्रदेशातून पाटील नेपाळमध्ये पसार झाल्याचा संशय पोलिसांना आहे.