पुणे, दि. १३ (पीसीबी) – ससून रूग्णालयात उपचार घेणारा अंमली पदार्थ तस्कर ललित अनिल पाटील याने पलायन केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण अनिल पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलवकडे यांना नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. त्यांना पुण्यात आणण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. दरम्यान, पोलिसांनी बलकवडेच्या नाशिक येथील घराची झडती केली असता त्यामध्ये तब्बल 3 किलो सोनं आढळून आलं आहे. पोलिसांनी ते जप्त केलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्याने दिली आहे.
कोटयावधी रूपयांचे सोनं जप्त करण्यात आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. पलायन करण्यासाठी घरामध्ये लपवुन ठेवलेल्या सोन्याचा वापर केला जाणार होता असं देखील पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान, अभिषेक बलकवडेने हे सोने ड्रग्सची तस्करी करूनच कमविल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. ललित पाटील आणि अभिषेक बलकवडे हे दोघे भेटल्याचं देखील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालं आहे. दोघांच्या भेटीचा सीसीटीव्ही सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र, त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत पोलिस अभिषेककडे विचारणा करीत आहेत. अभिषेक बलकवडेने ड्रग्सची तस्करी करून आणखी काही मालमत्ता जमवली आहे काय याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.