ड्रग्स रॅकेट प्रकरणात दोन पोलिसांना अटक पोलिस दलात मोठी खळबळ

0
501

पुणे, दि. १७ (पीसीबी) – ससून रूग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्स रॅकेट चालविणारा आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या ललित पाटील प्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील 2 पोलिस कर्मचार्‍यांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे संपुर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रूग्णालयात उपचार घेत असतना पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी संपुर्ण पोलिस दलाने कंबर कसली होती. अखेर त्याला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी परराज्यातून अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली.

न्यायालयाच्या परवानगीने ललित पाटील याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यात आणले. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, त्याच्या नाशिक येथील घराची झडती घेतली असता कोटयावधी रूपयाचे सोने आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले.

दरम्यान, ललित पाटीलने ज्या दिवशी ससून रूग्णालयातून पलायन केले त्या दिवशी ससून रूग्णालयात बंदोबस्तावर असणार्‍या पोलिस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव या मुख्यालयातील कोर्ट कंपनीच्या पोलिसांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने अटक केली आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

ललित पाटीलने ज्या दिवशी ससून रूग्णालयातून पलायन केले होते त्या दिवशी हे दोघेही डयुटीवर होते. कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी पोलीसनामा ऑनलाइनला दिली आहे.