ड्रग्ज माफिया ललित पाटील मुंबई पोलिसांच्या ताब्यात, चेन्नई येथून केली अटक

0
416

रथी महारथींची नावे समोर येण्याची शक्यता

पुणे, दि. १८ (पीसीबी) – ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा आरोपी २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील आरोपीचा पोलीस शोध लागत नव्हता. पण अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूील चेन्नई येथून ललित पाटील याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पाटील याच्या अटकेमुळे आता त्याला संरक्षण देणाऱ्या रथीमहारथींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा आरोपी २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेनंतर एकच खळबळ उडाल्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर अनेक आरोप प्रत्यारोप होत होते. त्या सर्व घडामोडी दरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोन आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केली.

ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापासून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी राजकीय नेत्यांनी मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. तर, ससून रुग्णालय प्रशासनालाही धारेवर धरण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला. पंधरा दिवसांपासून फरार असलेल्या ललितला अखेर पोलिसांनी तमिळनाडूतील चेन्नई येथून त्याला अटक केली. त्यामुळे आता अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.