डोळ्याला गॉगल, पायात स्पोर्ट्स शूज…; रावडी स्टाईलमध्ये महिला अधिकाऱ्याची बेधडक कारवाई

0
45

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : ब्राऊन टॉप, डेनिम जॅकेट, पायात स्पोर्ट्स शूज आणि डोळ्यांवर गॉगल… एखाद्या चित्रपटातल्या हिरॉईनचं हे वर्णन नाही तर ही आहे खऱ्याखुऱ्या आयुष्यातील एक डॅशिंग, रावडी अधिकारी. गोरेगावमधील या डॅशिंग महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून सगळीकडे तिचीच चर्चा सुरू आहे. गोरेगांव अतिक्रमण विभागाची वरिष्ठ अधिकारी नूतन जाधव यांच्याच नावाची चर्चा सध्या सगळ्यांच्या ओठी आहे. अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी कारवाई करत असताना विरोध करणाऱ्यांना खडसावून उत्तर देणाऱ्या नूतन यांच्या व्हिडीओने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.

गोरेगाव स्टेशन परिसरात दुकानांचे अतिक्रमणामुळे नागरिकांना खूप त्रास होतोय, चालायलाही जागा शिल्लक नाही अशा वारंवार तक्रारी येत होत्या. त्याच तक्रारीची दखल घेत बीएमसी अधिकारी तेथे दाखल झाले आणि त्यांनी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत ते उद्ध्वस्त केलं. या अधिकाऱ्यांमध्ये एक डॅशिंग महिलाही दिसत आहे. अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्या, हुज्जत घालणाऱ्या व्यक्तींना त्या महिला अधिकारी नूतन यांनी नजरेच्या धाकाने गप्प केलं. धारदार शब्दात उत्तर देत तिने मुद्दा निकाली काढला. तुमचा जो काही मुद्दा असेल त्याबद्दल ऑफीसमध्ये येऊन बोलायचं असं सांगत तिने हुज्जत घालणाऱ्यांचं तोंड बंद केलं. दुसरकीडे इतर अधिकारी शांतपणे त्यांचे काम करत होते. बुलडोझरच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं.

नूतन जाधव या अतिक्रमण विभागातील वरिष्ठ अधिकारी आहेत. 1 जून 1990 मध्ये नूतन जाधव या बीएमसी रुजू झाल्या. आपल्या तडफदार कामगिरीमुळे त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आणि त्यांची पदोन्नती होत गेली. 2004 मध्ये लायसन्स डिपार्टमेंट मध्ये बदली झाल्यानंतर नूतन यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकार पदाची परीक्षा दिली आणि तिथेही त्यांची नियुक्ती झाली. त्यांचा बेधडक अंदाज असून कामावर पूर्णपणे निष्ठा आहे.

गोरेगावमधील अधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर नूतन या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि बुलडोझर घेऊन घटनास्थळी पोहोचल्या. एकेक करून सर्व फेरीवाल्यांचं सामान ताब्यात घ्यायला त्यांनी सांगितलं. आणि या कारवाईला विरोध करणाऱ्यांची त्यांनी चांगलीच शाळा घेतली. एवढंच नव्हे तर फेरीवाल्यांसोबतच ज्या ज्या मोठ्या दुकानदारांनी फुटपाथची जागा अडवली होती त्यांनाही धडा शिकवला. कोणाच्याही विरोधाला भीक न घालता त्यांनी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. त्यांच्या या बेधडक अंदाजाचा आणि कारवाईचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. गोरेगावकर नागरिकही त्यांच्या या कारवाईचे कौतुक करत आहेत. आता या कारवाईनंतर फूटपाथ आणि रस्ते मोकळे झालेत, पण ते किती दिवस तसेच राहतील असा प्रश्न नागरिकांच्या मनात असून येणार काळच त्याचं उत्तर देऊ शकेल.