डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नवीन धमकीने,आखाती देशात धडकी

0
2

दि.१३ (पीसीबी)- मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा आज चौदावा दिवस असून संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने हल्ले सुरू असल्याने जागतिक स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिले सार्वजनिक निवेदन जारी करत अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळ बंद करा, अन्यथा हल्ले सुरूच राहतील, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

दुसरीकडे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, इराणमधील विद्यमान राजवट कोसळण्याच्या स्थितीत नसून इराणचे नेतृत्व लढाईत माघार घेण्यास तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत इराणला नवी धमकी दिली आहे. “आज इराणचे काय हाल होतात ते पाहा,” असे वक्तव्य करत ट्रम्प यांनी युद्ध अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले.

ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिका इराणच्या ‘दहशतवादी राजवटीला’ लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कमकुवत करत आहे. इराणचे नौदल, हवाई दल, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन प्रणाली मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मध्यपूर्वेतील वाढता तणाव, नागरिकांचे बळी आणि नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान याबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

जागतिक पातळीवर युद्धाचे परिणाम अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मध्यपूर्वेत पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिकच धोकादायक व निर्णायक टप्प्यात पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.