दि.१३(पीसीबी)-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारतावर टॅरिफ लावताना त्यांची दुटप्पी भूमिका जगाने बघितली. रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणाऱ्या चीनवर त्यांनी अतिरिक्त टॅरिफ लावला नाही. मात्र, भारताबाबत शुल्क कारण देत त्यांनी 50 टक्के टॅरिफ लावला. डोनाल्ड ट्रम्प जवळपास त्यांच्या विरोधात जाणाऱ्या सर्वच देशांवर टॅरिफ लावताना दिसत आहेत. टॅरिफची धमकी सातत्याने देत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला फक्त जगातूनच नाही तर थेट अमेरिकेतूनही मोठा विरोध होत आहे. लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात कोर्टात जात आहेत. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत मोठा धक्का बसला असून थेट तीन खासदार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मैदानात उतरली आहेत. भारतावरील 50 टक्के टॅरिफ काढण्याची या तीन खासदारांनी मागणी केली.
अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या तीन सदस्यांनी शुक्रवारी एक ठराव मांडला. याचा उद्देश ट्रम्प यांच्या राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेचा अंत करणे हाच आहे. भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत शुल्क अमेरिकेने लावले. संसद सदस्यांनी हे शुल्क बेकायदेशीर असल्याचे म्हटले. कामगार, ग्राहक आणि अमेरिका-भारत संबंधांना हानी पोहोचवत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.
हा ठराव अमेरिकन खासदार डेबोरा रॉस, मार्क वेसी आणि राजा कृष्णमूर्ती यांनी मांडला आहे. फक्त भारतच नाही तर ब्राझीलवरही लावण्यात आलेला टॅरिफ रद्द करावा, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या प्रस्तावानुसार, भारतावर लादलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हा हटवला पाहिजे. डेबोरा रॉस, मार्क वेसी आणि राजा कृष्णमूर्ती यांनी खासदार रो खन्ना आणि काँग्रेसच्या इतर 19 सदस्यांसह, अध्यक्षांना भारतावर लादलेले शुल्क मागे घेण्याचे आणि ताणलेले द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे आवाहन केले होते.
19 राज्यांनी थेट कोर्टात या निर्णयाच्या विरोधात धाव घेतल्याचीही माहिती मिळत आहे. यामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. आता भारतावरील टॅरिफ हटवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील दबाव हा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे. जर असाच दबाव डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायम राहिला तर डोनाल्ड ट्रम्प यांना भारतावरील टॅरिफचा निर्णय मागे घ्यावा लागू शकतो.





































